पान:सौंदर्यरस.pdf/६६

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
टीकाशास्त्र आणि साहित्य-निर्मिती
६१
 

सामर्थ्यही समाजाच्या बुद्धीला राहिले नाही. यासाठीच आपण इंग्रजी टीकाशास्त्र वाचले पाहिजे असे शास्त्रीबुवांनी सांगितले आहे. त्यामुळे काव्याचे मर्म जाणण्याची उत्कृष्ट शक्ती आपल्याला प्राप्त होईल व आनंदाचे एक अक्षय साधन लाभेल असे ते म्हणतात. अर्थात शास्त्रीबुवांच्या आधीच्या पिढीपासूनच पाश्चात्त्य टीकाशास्त्राचा व साहित्याचा अभ्यास येथे सुरू झाला होता शास्त्रीबुवांनी त्याला विशेष चालना दिली इतकेच. या अभ्यासामुळे आणि इतर पाश्चात्त्य विद्यांच्या प्रसारामुळेच महाराष्ट्र समाजाची अभिरुची सर्वथा पालटून गेली. साहित्याविषयी एक नवा दृष्टिकोन त्याला प्राप्त झाला व त्यामुळेच हरिभाऊ, केशवसुत, देवल, खाडिलकर, कोल्हटकर ही साहित्यलेखकांची नवी परंपरा येथे निर्माण झाली.

 साहित्यशास्त्र व साहित्य यांचा परस्पसंबंध काय ते वरील विवेचनावरून ध्यानात येईल. साहित्यक्षेत्रातील एखादी व्यक्ती किंवा एखादी ललितकृती एवढ्यापुरताच विचार केला, तर साहित्यशास्त्राचा साहित्यनिर्मितीशी प्रत्यक्ष असा फारसा संबंध नाही असे फार तर म्हणता येईल. तेथेही त्या साहित्यिकाच्या मनात, अबोधपूर्व का होईना, पण त्याचे स्वतःचे साहित्यशास्त्र निश्चित झालेले असले पाहिजे हे वर सांगितलेच आहे. पण हा साहित्यशास्त्राचा फार संकुचित अर्थ झाला. ज्या वेळी सर्व समाजाच्या साहित्याचा, त्यातील भिन्न युगांचा, तत्कालीन परिस्थितीचा, मानवी संस्कृतीचा आपण विचार करतो आणि भिन्न देशांतील साहित्यांच्या उत्कर्षापकर्षाची काही मीमांसा करतो तेव्हा साहित्यशास्त्राचा फार व्यापक अर्थ घ्यावा लागतो. त्या दृष्टीने पाहता साहित्याचा व साहित्यशास्त्राचा मग घनिष्ठ संबंध आहे हे आपल्या ध्यानात येईल. आधी साहित्यशास्त्र व मग साहित्य हा सिद्धान्त अगदी एकांतिक म्हणून सोडून दिला (तसा जन्य-जनक संबंधही काही ठिकाणी असलेला दिसतो) तरी साहित्याच्या विकासाला वैयक्तिक व सामाजिक अशा दोन्ही दृष्टींनी साहित्यशास्त्र हे अत्यंत अवश्य आहे हे आपणास मान्य करावे लागेल. प्रतिभा आणि समीक्षा या शक्ती परस्परविघातक तर नाहीतच, पण परस्परांना अत्यंत पोषक आहेत