पान:सौंदर्यरस.pdf/६५

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
६०
सौंदर्यरस
 

शास्त्र इत्यादी शास्त्रांचा, समाजजीवनामागल्या या प्रेरणांचा अभ्यास केल्यावाचून नवसाहित्याला प्रेरणा देण्यास, नवयुग निर्माण करण्यास समर्थ असे शास्त्र साहित्यशास्त्रज्ञाला निर्माण करता येणार नाही. पण मराठीच्या प्रारंभीच्या काळापासून वरील शास्त्रांचा अभ्यास महाराष्ट्रात झालाच नाही. त्याविषयी सर्व समाजनेते उदासीन होते. धर्म व तत्त्वज्ञान यांतील पारंपरिक मते प्रसूत करणारे वाङ्मय येथे निर्माण झाले; पण ती काही शास्त्रचिकित्सा नव्हे. आणि शास्त्रचिकित्सा न झाल्यामुळे मराठीचे साहित्यशास्त्र निर्माणच झाले नाही. डॉ. केतकरांनी म्हटल्याप्रमाणे गुरुपरंपरा, शब्दप्रामाण्य, यामुळे येथल्या लेखकांची परीक्षणशक्ती क्षीण होऊन गेली होती. आधी होऊन गेलेल्या कवींना भक्तिभावाने वंदन करण्यापलिकड काही करण्याचे सामर्थ्यच त्यांच्या बुद्धीला नव्हते.
 आणि नवे साहित्यशास्त्र निर्माण न झाल्यामुळे नवे साहित्यही महाराष्ट्रात निर्माण झाले नाही. कादंबरी, नाटक, लघुकथा, निबंध, विनोद यांपैकी कोणताही वाङ्मयप्रकार येथे अस्तित्वातच आला नाही. इतकेच नव्हे, तर संस्कृतातील तशा श्रेष्ठ काव्याविषयी अत्यंत विपरीत व हीन अभिरुचिदर्शक अशी मते समाजात व पंडितवर्गात रूढ झाली होती. कालिदास, भवभूती, भारवी यांच्यापेक्षा त्या पंडितांना माघ, श्रीहर्ष हे कवी श्रेष्ठ वाटत. शब्दचमत्कृती, शाब्दिक कसरती यांनाच ते काव्य समजत. 'विद्वत्व आणि कवित्व' या आपल्या निबंधात विष्णुशास्त्री म्हणतात,- 'आपल्या लोकांत तर या काव्यशास्त्रविवेचनाचा अलिकडे मुळीच लय झाला आहे असे म्हटल्यास हरकत नाही. आपल्या जुन्या पंडितांस काव्याभिरुची कितपत असते हे त्यांच्या संस्कृत कवितेवरून, त्यांच्या टीकांवरून व संभाषणांवरून अगदी स्पष्ट दिसून येते. युरोपातील सामान्य पंडितास आमचे काव्यग्रंथ जसे समजतात तसे इकडील मोठमोठ्या शास्त्र्यांसही अगदीच समजत नाहीत. व त्यांतील अप्रतिम रसाचा आस्वाद घेण्यास जर हे परस्थ लोक आम्हांस न शिकविते तर तो आम्हास कधीही समजता ना, यातही अगदी संशय नाही.'
 काव्यशास्त्रविवेचन थांबल्यामुळे येथे अनेकविध जिवंत वाङ्मयप्रकार तर निर्माण झाले नाहीतच; पण जुन्या संस्कृत काव्याचे सौंदर्य जाणण्याचे