पान:सौंदर्यरस.pdf/६३

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
५८
सौंदर्यरस
 

 पण याहीपेक्षा एक खेदजनक गोष्ट आहे. व्यक्तिदर्शन, मनोविश्लेषण, ध्येयवाद, वास्तववाद इत्यादी. साहित्यगुणांच्या दृष्टीने या पुढल्या काव्य नाटकांची समीक्षा तर कोणी केली नाहीच. या गुणांचा विचारही संस्कृत साहित्यशास्त्रात झालेला नाही. पण रस, ध्वनी, औचित्य इत्यादी ज्या गुणांची चर्चा संस्कृत साहित्यशास्त्राने केली आहे, त्यांच्या दृष्टीनेही वरील काव्यनाटकांची समीक्षा कोणा संस्कृत पंडिताने केली नाही. मल्लीनाथ, राघवभट्ट यांनी या काव्यांवर टीका लिहिल्या; पण सामान्य अर्थ सांगण्यापलिकडे त्यांनी फारसे काही केले नाही. त्या समीक्षा नव्हेतच. त्यांनीच म्हटल्याप्रमाणे त्या केवळ अर्थद्योतनिका होत. जीवनाचे सारखे अवलोकन करीत राहिल्याने जसे शास्त्र वाढीस लागते त्याचप्रमाणे साहित्याची सतत समीक्षा करीत राहिल्याने साहित्यशास्त्र वाढीस लागते. संस्कृतात ते कोणी केलेच नाही. संस्कृत टीकाकार 'मृच्छकटिक', 'शाकुंतल', यांसारख्या ललितकृतींची समीक्षा करीत राहिले असते तर व्यक्तिदर्शनादी साहित्यगुणांची आज पाश्चात्त्य साहित्यशास्त्राच्या अभ्यासामुळे जी आपणास या नाटकात प्रतीती होते ती त्या काळीच झाली असती आणि संस्कृत साहित्याचे संपूर्ण सौंदर्यदर्शन घडविण्यास संस्कृत साहित्यशास्त्र समर्थ झाले असते. पण स्वकालीन साहित्याचे सौंदर्यसुद्धा सर्वांगांनी विशद करण्याची ऐपत त्या शास्त्राला लाभली नाही. कारण अर्थापलिकडचे सौंदर्य पाहण्याचा प्रयत्नच टीकाकारांनी केला नाही.

 तसा त्यांनी केला असता तर त्या वेळच्या काव्यनाटकांचे सौंदर्य त्यांना आविष्कृत करता आले असतेच, पण त्याहून एक महत्त्वाची गोष्ट घडली असती. वरील काव्यनाटके कितीही अलौकिक असली तरी काही परंपरा, काही चकारी सोडून ती बाहेर पडतच नाहीत. ती सर्व अद्भुत पौराणिक आदर्शवादातच रमतात. कठोर वास्तव जीवनाकडे पाहण्याचे सामर्थ्य त्यांना नाही. काही दण्डक प्रमाण मानल्यामुळे ते कवी शोककाव्य लिहू शकले नाहीत. 'सर्व दुःखमय जगत ।' हा तत्त्वज्ञानाचा सिद्धान्त. पण काव्यात त्याची प्रतीती मुळीच नाही ! डॉ. वाटवे यांनी म्हटल्याप्रमाणे नायक, नायिका, विट, कंचुकी, विदूषक ह्या पात्रांना पुढे संस्कृत साहित्यात