पान:सौंदर्यरस.pdf/६२

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
टीकाशास्त्र आणि साहित्य-निर्मिती
५७
 

ती सुखे मिळू लागली, हा शास्त्राचा महिमा होय. हाच प्रकार साहित्याचा आहे असे वाटते. साहित्यशास्त्राच्या काधी मानव काव्ये लिहीत होता. त्यांच्या अवलोकनानेच त्याला पुढे साहित्यशास्त्र रचता आले आणि मग त्या शास्त्राने साहित्याच्या प्रगतीला फार मोठे साह्य केले, असा हा क्रम आहे असे वाटते. जेथे भौतिक शास्त्रे निर्माण झाली नाहीत तेथे नावांच्या किंवा घरांच्या बांधणीत कसलाही फरक झाला नाही हे जसे खरे, त्याचप्रमाणे जेथे साहित्यशास्त्र निर्माण झाले नाही तेथे साहित्यांतही प्रगती झाली नाही हेही खरे आहे. अर्थात मानवी जीवनाची शास्त्रे भौतिक शास्त्राइतकी काटेकोर कधीच नसतात. जलतरणशास्त्र सिद्ध झाले नाही तर नावेची प्रगती होणे शक्य नाही हे अगदी खरे; पण इतक्या निश्चयाने साहित्याबद्दल विधान करता येईल असे वाटत नाही. या दृष्टीने प्राचीन संस्कृत व प्राचीन मराठी साहित्याचा इतिहास पाहणे जरा उद्बोधक होईल.

 'रामायण' व 'महाभारत' ही संस्कृतांतली महाकाव्ये म्हणजे कविप्रतिभेचा उत्तुंग विलास होय, हे सर्वमान्य आहे. पण दुर्दैव असे की, संस्कृतात त्यांचे सौंदर्य विशद करणारा एकही टीकाग्रंथ नाही. संस्कृत साहित्यशास्त्राचा इतिहास मोठा उज्ज्वल आहे. पण त्यातील कोणत्याही साहित्यशास्त्रज्ञाने 'रामायण' व 'महाभारत' यातील कथानकरचना, व्यक्तिदर्शन, ध्येयवाद, वास्तववाद, संवादरचना, मनोविश्लेषण, निसर्गवर्णन, रसपरिपोष यांतील सौंदर्य उकलून दाखविले नाही. या महाकाव्यांत लोकजीवनाचे खरेखुरे दर्शन घडते. त्या काळच्या समाजस्थितीचे पूर्ण प्रतिबिंब त्यात आपणास पहावयास सापडते. पण या महाकाव्यांवर टीकाग्रंथ लिहून लोकजीवनदर्शनाचा महिमा कोणाही शास्त्रज्ञाने त्या काळी लोकांना पटवून दिला नाही. पुढच्या काळात साधारणतः इसवी सनाच्या पहिल्या हजार वर्षांत 'मृच्छकटिक', 'कुमारसंभव', 'रघुवंश', 'शाकुंतल', 'उत्तरराम-चरित', 'मुद्राराक्षस' 'किरातार्जुनीय' इत्यादी काही अलौकिक अशी काव्यनाटके निर्माण झाली. पण त्यांत भोवतालच्या समाजाचे, तत्कालीन लोकजीवनाचे दर्शन अपवादात्मकच आहे. कवींना तशी प्रेरणा मिळाली नाही आणि साहित्यशास्त्रज्ञांनीही तसा आग्रह धरला नाही. उलट साहित्यशास्त्रज्ञ त्याविषयी उदासीनच होते.