पान:सौंदर्यरस.pdf/६१

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
५६
सौंदर्यरस
 

चिकित्सा, त्यांचे विवरण हा टीकाशास्त्र याचा अर्थ घेतला तर वरील विधानात आक्षेपार्ह असे काही नाही हे सहज ध्यानात येईल, कवी हा साहित्य- शास्त्र वाचून काव्य लिहीत नाही यात वाद नाही. तसे त्याने लिहू नये हेच योग्य. पण हा सर्व समाजाच्या मनःक्रान्तीचा प्रश्न आहे. एका व्यक्तीचा नव्हे आणि त्या दृष्टीने पाहता सर्व समाजाची जी अभिरुचीची एक विशिष्ट पातळी, ती तयार करण्यात समीक्षाशास्त्राला निःसंशय महत्त्व आहे. आणि यांतूनच कवीच्या मनाची तयारी होत असते. त्याने प्रत्यक्ष साहित्यशास्त्र व्यक्तिशः वाचलेले असो की नसो, साहित्यविषयक सिद्धान्त त्याच्या मनात निश्चित ठरलेले असतात आणि त्याअन्वयेच तो लिहीत असतो. या सिद्धान्तावाचून स्वतःच्या साहित्यातील बरेवाईट त्याचे त्यालाच कळणार नाही.

 सेंटस्बरी व लोवेल यांची वचने वर दिली आहेत. त्यांनी टीकाशास्त्राचा महिमा सिद्ध होतो हे खरे. प्रतिभेचे युग संपले म्हणजे मग टीकेचे युग सुरू होते, हा सिद्धान्त किती एकांतिक आहे हे त्यावरून दिसते. पण आपापल्या परी तेही सिद्धान्त एकांतिक आहेत असे वाटते, जर्मनी किंवा अमेरिका या देशातील त्या कालखंडात तसे घडले असेल. टीकाशास्त्राने युग पालटून समाजाला नवी दृष्टी दिल्यामुळे तेथे नवसाहित्याचा उदय झाला हे खरे असेल. पण त्यामुळे हा सिद्धान्त सार्वत्रिक मानता येईल, असे वाटत नाही. प्राचीन संस्कृत वा ग्रीक साहित्याचा विचार केला तर 'रामायण', महाभारत', 'इलियड' या महाकाव्यांच्या पूर्वकाळी भारतात किंवा ग्रीसमध्ये साहित्यशास्त्र परिणत अवस्थेस गेले होते आणि या महाकाव्यांमागे तशा तऱ्हेची प्रेरणा होती असे म्हणता येत नाही. सामान्यतः लोकव्यवहार व भौतिक शास्त्रे यांचा जो संबंध आहे तोच साहित्य व साहित्यशास्त्र यांचा असतो असे वाटते. पाण्यावर पदार्थ कसे तरंगतात याविषयी शास्त्र तयार होण्याच्या आधी अनुभवाच्या जोरावर हजारो वर्षे मानव नाव चालवीतच होता. वैद्यकशास्त्राच्या उदयाच्या आधी झाडपाल्याचे औषध तो वापरीतच होता. आणि स्थापत्यशास्त्र सिद्ध होण्यापूर्वी घरे बांधून राहातच होता. शास्त्रे सिद्ध झाल्यामुळे मूळच्या अनुभवाच्या ज्ञानात अनेक पटींनी भर पडली व जलवाहतुकीचे, औषधांचे व घरांचे रूप कल्पनातीत पालटून गेले व बहुजनांना