पान:सौंदर्यरस.pdf/६०

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
टीकाशास्त्र आणि साहित्य-निर्मिती
५५
 

नाटक होय. त्यात प्रथमच लोकजीवनाचे दर्शन घडले. जनतेला साहित्यात स्वतःचेच दर्शन घडल्यामुळे फार आनंद झाला. स्वतःचे दर्शन वाङ्मयात झाले की, लोकांना नव्या प्रेरणा मिळतात.

 लेसिंगचा 'ला ओकून' हा साहित्यशास्त्रीय ग्रंथ फार प्रसिद्ध आहे. मन्वंतर घडवून आणले ते यानेच. आधीच्या काळी साहित्य हे नियमबद्ध करून टाकण्याकडे प्रवृत्ती होती. त्यामुळे नियमावली रचणे, व ती अन्वये निवाडा देणे हेच टीकाकाराचे कार्य, असे मानले जात असे. यामुळे साहित्य निर्जीव झाले होते. त्याला मृतकळा आली होती. त्यातील जिवंतपणा, सहजस्फूर्ती, भावनांचा जिव्हाळा, सर्व सर्व नष्ट झाले होते. लेसिंगच्या या ग्रंथाने लोकांना नवी दृष्टी दिली. सेंटस्बरी हा पाश्चात्त्य साहित्यशास्त्राचा इतिहासकार लेसिंगविषयी म्हणतो की, जर्मनीत महाकवी गटे निर्माण झाला याचे श्रेय लेसिंगला आहे. इंग्लंडमध्ये कोलरिज निर्माण झाला हाही त्याच्याचमुळे. केवळ सेंटस्बरीचे हे मत आहे असे नव्हे; तर खुद्द गटेने हीच भावना व्यक्त केली आहे. विद्युल्लतेप्रमाणे त्याने आमचा मार्ग उजळून टाकला. जुने शास्त्र रद्द करून नवे साहित्यशास्त्र निर्माण केले, म्हणून (लेसिंग) ही अर्वाचीन युरोपीय साहित्याची गंगोत्री आहे, असे तो म्हणतो. ॲरिस्टॉटलनंतर लेसिंग हाच मोठा साहित्यशास्त्रज्ञ झाला, असे पाश्चात्त्य टीकाकार मानतात व त्याची योग्यता डार्विन, सिग्मंड फ्रॉइड यांच्यासारखीच आहे असे समजतात. 'नवे साहित्य निर्माण होण्याआधी नवे साहित्यशास्त्र निर्माण व्हावे लागते' या म्हणण्याचा अर्थ आता आपल्याला समजेल. अमेरिकन साहित्यशास्त्रज्ञ लोवेल याने असा अभिप्राय दिला आहे. साहित्य उदयाला येण्यापूर्वी साहित्यशास्त्र उदयास येणे अवश्य असते असे तो म्हणतो. आणि अमेरिकेने साहित्य हे अमेरिकन समीक्षेमुळे जन्माला आले असे विधान करतो. टीका म्हणजे केवळ गुणदोषपरीक्षण इतकाच अर्थ घेतला तर हे विधान विचित्र- नव्हे, हास्यास्पदही वाटेल. पण लोकजीवनातून साहित्य निर्माण व्हावे, त्यात राष्ट्रीय अस्मितेचा आविष्कार झाला पाहिजे, ते यम-नियमांच्या कैचीत बसविता कामा नये, जीवनदर्शन, जीवनभाष्य हा त्याचा हेतू असावा, कवीच्या जगाकडे पाहण्याच्या दृष्टिकोनाला त्यात प्राधान्य असावे, ही जी मूलतत्वे, त्यांची