पान:सौंदर्यरस.pdf/५९

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
५४
सौंदर्यरस
 

त्यातील एखाद्या विशिष्ट ललितकृतीचे परीक्षण हा जो भाग तोच प्राधान्याने लोकांच्या डोळ्यांसमोर असतो. वरील उद्गार टीकाशास्त्राच्या या विभागाला उद्देशून असले तर एखादे वेळी सार्थ असतील. तेही खरे नव्हे. अशा परीक्षणांचेही अतिशय महत्त्व असते. पण कित्येक वेळा या परीक्षणांची उपेक्षा करणे साहित्यिकाला शक्य होईल. पण टीकाशास्त्राचा साहित्याच्या मूलतत्त्वांचे विवेचन, साहित्याच्या प्रेरणांचा अभ्यास, साहित्याच्या सामर्थ्याचे मापन, हा जो दुसरा भाग, त्याची उपेक्षा कोणाला कधीच करता येणार नाही. ती केली की साहित्याला अवकळा आलीच म्हणून समजावे. नव्या प्रेरणांतूनच नवे साहित्य निर्माण होत असते. आणि या नव्या प्रेरणा समाज जीवनाचा अभ्यास करून टीकाकार निर्माण करीत असतो. म्हणजे साहित्य- क्षेत्रात युगपालट करावा, मन्वंतर घडवावे, हा टीकाकाराचा अधिकार आहे.

 टीका म्हणजे स्तुती नव्हे आणि निंदाही नव्हे. तर एक नवे तत्त्व. नव्या काळाला उपयोगी, जीर्ण साहित्याचा उद्धार करणारे तत्त्व. जर्मन टीकाकार लेसिंग (१७२९- १७८१) याला अर्वाचीन युरोपीय टीकाशास्त्राचा जनक म्हणतात. साहित्य हा राष्ट्रीय प्रतिभेचा आविष्कार आहे असा सिद्धान्त त्याने सांगितला व त्याचे फार दूरगामी परिणाम होऊन पाश्चात्त्य जगात साहित्यक्षेत्रात मन्वंतरच झाले. लेसिंगच्या काळात जर्मनीत फ्रेंच भाषेचे फार वर्चस्व होते. महाराणा फ्रेडरिक याने जर्मन राष्ट्राभिमान जागृत केला, पण त्याला जर्मन भाषेचा तिटकारा असून फ्रेंच प्रिय होती. आणि सर्व जर्मन साहित्यिकांची तशीच भावना असून ते फ्रेंचांचे अनुकरण करण्यात धन्यता मानीत. अशा वेळी साहित्य हा राष्ट्रीय अस्मितेचा आविष्कार असून तो मातृभाषतच होऊ शकतो, हा सिद्धान्त लेसिंग याने सांगितला. त्यामुळे जर्मनीत एकदम नवचैतन्य निर्माण झाले व जोमदार आणि सकस जर्मन साहित्य निर्माण होऊ लागले. या सिद्धान्ताप्रमाणेच साहित्यात लोकजीवनाचे दर्शन घडले पाहिजे व ते बहुजनांच्या भाषेतून, लोकभाषेतून घडले पाहिजे असा दुसरा सिद्धान्त लेसिंगने सांगितला. स्वतः लेसिंग हा जसा टीकाकार तसाच मोठा साहित्यिक होता. 'मिना व्हॉन बॅनहेल्म' हे त्याचे सर्वश्रेष्ठ