पान:सौंदर्यरस.pdf/५८

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
टीकाशास्त्र आणि साहित्य-निर्मिती
५३
 

साहित्यनिर्मिती अगदी आगळी अशी झाली. हीन, पतित अशा जीवनाचे नुसते यथार्थ चित्र हे शरदबाबूंच्या मते साहित्य नव्हे. तर त्या पातित्याचा मानवी जीवनाशी संबंध दाखवणे ही कला होय, हे साहित्य होय. सत्य, सौंदर्य यांविषयीही त्यांचे मत असे निश्चित झालेले होते. ते म्हणतात,- 'जगात घडणाऱ्या घटना मुळात सुंदर नसतील, किंवा जगातल्या सुंदर वस्तु कादंबरीच्या दृष्टीने सत्य नसतील. सत्याला मी मूर्त करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा प्रथम ते कुरूप दिसते. पण लौकिक सत्याचा होम करताच त्यातून सौंदर्य निर्माण होते. जगातली कुरूपता ज्याने पाहिली नाही, दुःखाचे आघात ज्याने सोसले नाहीत, यातना, निराशा ज्याने भोगल्या नाहीत, त्याला जीवनाचे खरे प्रेम असण शक्य नाही व ते असल्यावाचून मनुष्याच्या हातून खरे मानवदर्शन घडावयाचे नाही.' असे शरदबाबूंचे मत होते. शरदबाबू हें तंत्राविषयी फार जागरूक असत. खरा मानव दाखविण्यासाठी तंत्राची फार आवश्यकता असते, असे त्यांना वाटे. म्हणून वाक्यरचना, शब्दयोजना यांचा छापण्यापूर्वी ते अनेक वेळा परिष्कार करीत. लेखक असा परिष्कार करतो याचा अर्थच हा की, टीकाशास्त्राचे सिद्धान्त त्याच्या मनात निश्चित झालेले असतात. त्यावाचून परिष्करण शक्यच होणार नाही. व्यक्तिरेखा आधी निश्चित करून मग त्यातून कथानक निर्मावे, कथानकात व्यक्ती भरू नयेत, हा स्वतःचा साहित्य सिद्धान्त त्यांनी प्रत्येक कादंबरीत प्रत्यक्षात आणला हे सर्वविश्रुत आहे.
 टीकाशास्त्र आणि साहित्यनिर्मिती यांचा विरोध तर नाहीच. पण प्रतिभा व समीक्षा या शक्ती परस्परांना साहाय्यकच आहेत, हे आतापर्यंतच्या विवेचनावरून ध्यानात येईल असे वाटते. पण समीक्षा ही शक्ती अप्रत्यक्षपणे साहित्याला उपकारक ठरते. प्रत्यक्ष नव्हे, असे वरील उदाहरणांवरून वाटण्याचा संभव आहे. म्हणून समीक्षा ही प्रत्यक्षच साहित्यनिर्मितीला कशी पोषक आहे, हे दाखविणे अवश्य आहे. तो विचार आता पाहू.
 साहित्यशास्त्र वाचून कोणी साहित्य लिहावयास बसत नाही, असे नेहमी म्हटले जाते, आणि ते खरेही आहे. पण यातून टीकाशास्त्राचा जो अधिक्षेप केला जातो तो खरा नाही. टीकाशास्त्राचे दोन विभाग असतात