पान:सौंदर्यरस.pdf/५७

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
५२
सौंदर्यरस
 

'आपुल्या बळाने आम्ही बोलत नाही, आमचा कृपावंत सखा विठ्ठल, त्याची ही वाचा आहे.' अशा प्रकारचे संतांचे उद्गार प्रसिद्धच आहेत. याचा अर्थ असा की, संतांनी साहित्यशास्त्रावर ग्रंथ लिहिले नसले तरी त्यांनी आपले साहित्यशास्त्रीय सिद्धान्त मनाशी निश्चित केलेच होते. त्यांना जुन्या संस्कृत परंपरेप्रमाणे लिहावयाचे नव्हते. अर्थातच नवे टीकाशास्त्र ठरवून ठेवणे त्यांना भागच होते.
 प्रत्येक थोर लेखक हा साहित्यशास्त्रज्ञ असतोच, त्याने टीकाग्रंथ लिहिले नाहीत तरी त्याच्या मनात टीकाशास्त्र सिद्ध असते व त्याअन्वये तो आपल्या व इतरांच्या साहित्याची सारखी समीक्षा करीत असतो, हा विचार वरील उदाहरणांवरून सहज पटेल असे वाटते. आणखी एक-दोन उदाहरणे देऊन त्याचे विवेचन पुरे करू. रवीन्द्रनाथ ठाकुरजींनी अनेक साहित्य विषयक सिद्धान्त सांगितले आहेत हे सुप्रसिद्धच आहे. कला ही स्वार्थ आहे की परार्थ, हा अलिकडे मोठा वाद आहे. रवीन्द्रांचे त्यावर निश्चित उत्तर आहे. केवळ स्वतःच्या आनंदासाठी लिहिलेले ते साहित्य नव्हे. वाचक, श्रोते हेच कवीचे उद्दिष्ट असते; असले पाहिजे. आईचे दूध हे मुलासाठी असते, आणि त्यात अनैसर्गिक असे काही नाही. जे लाकूड जळत नाही त्याला अग्नी कसे म्हणावे? लाकडाच्या अंगी अग्नी सुप्त असतो, पण त्याला कोणी अग्नी म्हणत नाही. तसेच कवीचे आहे. आविष्कार, प्रकटीकरण हेच काव्य होय. मानवी मनाची, रवीन्द्रांच्या मते, प्रवृत्तीच अशी की अनेकांमध्ये स्वतःचे अस्तित्व अनुभवावे. सर्व कलांचा जन्म या प्रेरणेने होतो. मी अमर व्हावे, मी इतरांच्या मनात वसावे ही इच्छाच कलाविष्काराच्या मागे असते. आणि इतरांच्या मनात प्रवेश करण्याचे साधन म्हणजे भावना. त्यांना अमरत्व असते. ज्ञानाचे एकदा आकलन झाले की ते शिळे होते. भावना शिळ्या होत नाहीत. रामायण, शाकुंतल ही काव्ये आजही रम्य वाटतात त्याचे हे कारण आहे. अशा भावना प्रथम आपल्याशा करून मग त्या सर्वांच्या करणे हेच साहित्याचे कार्य. रवीन्द्रांनी जे जे साहित्य लिहिले त्याचे शास्त्र या रीतीने त्यांनीच सांगितले आहे.
 शरच्चंद्र चतर्जी यांनीही आपल्या साहित्याचे शास्त्र मनाशी निश्चित केले होते. त्यांच्या ठायीचा टीकाकार अखंड जागृत होता म्हणूनच त्यांची