पान:सौंदर्यरस.pdf/५६

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
टीकाशास्त्र आणि साहित्य-निर्मिती
५१
 

आहे.' अमूर्ताचे मूर्त कसे करावे याचे शास्त्र तर शेक्सपीयरने बोधपूर्वक जाणले असले पाहिजे. कारण ते त्याने स्पष्ट करूनच सांगितले आहे. 'जे अमूर्त आहे, अज्ञात आहे ते कवीच्या कल्पनेत प्रथम साकार होते नंतर कवी आपल्या लेखणीने त्याला प्रत्यक्षात आकार देतो आणि जे केवळ भावमय, भासवत् असते त्याला स्थळकाळाने व नामरूपाने बद्ध करतो.' अशी प्रक्रिया त्याने स्वतःच सांगितली आहे.
 महाराष्ट्रातील ज्ञानेश्वर, एकनाथ, तुकाराम या संतांनी आपले साहित्य लिहिले ते संस्कृत साहित्याच्या परंपरेहून फार निराळ्या रीतीचे होते. त्यामुळे त्यांना आपले साहित्यशास्त्र मनाशी निश्चित करून मगच लिहावे लागले. काव्यहेतु, काव्यकारण, काव्यगुण या सर्व बाबतीत त्यांचे मत रूढ परंपरेहून निराळे होते. ते सांगण्यासाठी त्यांनी स्वतंत्र साहित्यशास्त्र लिहिले नाही, पण आपल्या काव्यांत मधुनमधून आपले साहित्यविषयक सिद्धान्त त्यांनी सांगून ठेवले आहेत. 'या कथेच्या आईकण्याने श्रवणासि पारणे होते व संसारदुःखाला मोकलता येते' या शब्दात ज्ञानेश्वरांनी आपल्या काव्याचा हेतू सांगितला आहे. त्यांना लोकांना मोक्ष द्यावयाचा होता. गीतार्थाने विश्व भरून टाकून जग हे आनंदाचे आवारू होऊन जाईल असा वाग्विलास विस्तारावयाचा होता. एकनाथांचाही काव्यरचनेचा हाच हेतू होता. 'एकादशा ऐशा ग्रंथांत ठाकठीक परामर्श तुम्हांला सापडेल. सर्व महाकवी असले काव्य रचूनच निजहितार्थ पावले', असे ते सांगतात. काव्यगुणांविषयीही संतांचे मत असेच निश्चित ठरलेले होते. तुकाराम म्हणतात की, 'काव्याला मुख्य अलंकार म्हणजे अनुभव. केवळ शब्दांचे गौरव कामा नये. कारण आम्हाला काही चित्ता रंजवणी करावयाची नाही. ती रमेट कहाणी येरांनी सांगावी. आम्ही पिटू भक्तीचा डांगोरा, कळिकाळासी दरारा. ती भक्ती हा आमच्या काव्याचा मुख्य गुण होय.' रामदासांनी हेच सांगितले आहे. 'भक्तिहीन कवित्व म्हणजे ठोंबे मत असें जाणावें. कामिक, रसिक, शृंगारिक, कौतुक विनोद अनेक' याला रामदास धीटपाठ काव्य म्हणतात. त्यांच्या मते हे काव्यगुण नव्हेतच. प्रतिभा ही ईश्वरदत्त आहे, असे सर्व संत कवींचे मत होतें. 'एकासि अभ्यासिता नये, (खटपट करूनही साधत नाही; पण) एकासि स्वभावेचि ये, ऐसा भगवंताचा महिमा काये, कैसा कळेना.'