पान:सौंदर्यरस.pdf/५५

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
५०
सौंदर्यरस
 

 मॅक्झिम गॉर्कीने 'मदर' ही कादंबरी लिहिली. ती लिहून त्याने कादंबरीलेखनाच्या तंत्रात आमूलाग्र क्रांती केली. आता 'मदर' लिहिताना ते जे नवे तंत्र त्याने अवलंबिले त्यातूनच नवे साहित्यशास्त्र निर्माण झाले. साहित्याविषयी काही भिन्न कल्पना निश्चित केल्यावाचून- किंवा सहजगत्या झाल्यावाचून- गॉर्कीला 'मदर' कादंबरी लिहिता आली नसती. मानव हाच सर्व कर्ता-करविता नवसृष्टीचा निर्माता होय, जगातले सर्व सौंदर्य श्रमानेच निर्माण होते, श्रमातूनच उदात्त विचार, उदात्त कल्पना निर्माण होतात. हे त्याचे सिद्धान्त त्याला कादंबरीत सांगावयाचे होते. त्यांना मूर्त रूप द्यावयाचे होते. आता अमूर्ताला मूर्त रूप कसे द्यावयाचे हेच साहित्यशास्त्रात सांगितलेले असते. गॉर्कीने ते शास्त्र स्वतः लिहिले नसले तरी त्याने ते जाणले असलेच पाहिजे. त्यावाचून तो मूर्त रूप देणार कसा? हे मूर्त रूप देताना मानव व्यक्ती ज्या रेखावयाच्या त्याचेही त्याने चिंतन केले होते. 'समाजवादी वास्तववाद' त्यातूनच निर्माण झाला. हा वास्तववाद म्हणजे कलेचे नवे रूप होय, असे त्यांचे मत होते. केवळ जुन्या किंवा सध्याच्या समाजाचे चित्र काढून नव्या कलेचे समाधान होत नाही. आजच्या समाजाने जी क्रांती घडविण्याचे योजिले आहे तिला साह्य करणे आणि भविष्यकाळ कसा उज्ज्वल होणार आहे ते दाखविणे, हे त्याच्या मते, नव्या कलेचे उद्दिष्ट आहे आणि त्यासाठी मानवाची स्थिर अशी व्यक्तिचित्रे न काढता सतत गतिमान परिवर्तनशील, विकासशील अशी व्यक्तिचित्रे काढली पाहिजेत असे समाजवादी वास्तववादाचे मत आहे. हे सिद्धान्त हेच नवे साहित्यशास्त्र होय. आणि ते 'मदर' लिहिणाऱ्या गॉर्कीनेच सांगितलेले आहे.

 शेक्सपीयर काही टीकाकार म्हणून प्रसिद्ध नाही. पण अनेक साहित्यशास्त्रविषयक सिद्धान्त त्यानें आपल्या मनाशी निश्चित केले होते. हे त्याच्या नाटकांवरून दिसून येते. हॅम्लेट हा त्याने बोलाविलेल्या नाटक-मंडळीतल्या नटांना उपदेश करतो, त्यात साहित्यशास्त्र सहज यऊन जाते. तो म्हणतो,-, नैसर्गिक दिसेल तेच करा. त्याच्या पलिकडे जाऊ नका. कारण तसे केल्याने नाट्यकलेचा हेतू साधत नाही. निसर्गाची तंतोतंत आरशातल्याप्रमाणे प्रतिकृती वठविणे हाच प्राचीन काळापासून आजपर्यंत नाट्यकलेचा हेतू