पान:सौंदर्यरस.pdf/५४

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
टीकाशास्त्र आणि साहित्य-निर्मिती
४९
 

नाही, समीक्षेचा एकही लेख त्याच्या लेखणीतून उतरणार नाही, हे शक्य आहे. पण समीक्षाशक्ती त्याच्या चित्तात प्रतिक्षणी जागृत असल्यावाचून त्याला कलाकृतीची निर्मिती सर्वथा अशक्य आहे. हरिभाऊंचे उदाहरण, आपण घेऊ. त्यांनी पाश्चात्य कादंबऱ्या वाचल्या, काव्य वाचले. स्कॉट डिकन्स, थॅकरे, ड्यूमा यांच्या साहित्याचा अभ्यास केला आणि आपण अशा तऱ्हेचे साहित्य लिहावे असे मनाशी ठरविले. पण अशा म्हणजे कशा तऱ्हेचे, हे त्यांना मनाशी निश्चित करावे लागलेच असणार. आपण आपल्या साहित्यात लोकजीवनाचे दर्शन घडवावयाचे, त्यात पूर्वीच्या हळबे, रिसबूड या कादंबरीकारांप्रमाणे अद्भुत प्रसंग न आणता वास्तव प्रसंग वर्णावयाचे, कथानकापेक्षा व्यक्तिदर्शनाला महत्त्व द्यावयाचे, हे व अशा तऱ्हेचे अनेक सिद्धान्त त्यांनी कळत-नकळत मनाशी निश्चित केले नसते तर मराठी कादंबरीच्या क्षेत्रात त्यांना युगपरिवर्तन करताच आले नसते, आणि हे सिद्धान्त निश्चित करणे म्हणजेच आपले समीक्षाशास्त्र ठरविणे होय चित्रकार चित्र काढीत असतो किंवा मूर्तिकार मूर्ती घडवीत असतो, त्या वेळी मधून मधून थोडे दूर जाऊन आपल्या कृतीचे तो निरीक्षण व समीक्षणही करतो. रंगसंगती साधली आहे की नाही, भावदर्शन झाले आहे की नाही, निम्नोन्नत भाग योग्य आहेत की नाही, हे सर्व त्याचे त्याला जाणता आले नाही तर काय होईल ? दर वेळी तो कलेच्या टीकाकाराला बोलावून विचारणार की काय ? चित्राची वा मूर्तीची समीक्षा त्याची त्याला आली नाही तर त्याच्या हातून उत्तम कलाकृती निर्माण होणे शक्य नाही. तेच साहित्याचे आहे. कथानक रचताना त्यात समरप्रसंग असला पाहिजे, त्यात चढउतार असले पाहिजेत, त्यांनी उत्कंठावर्धन झाले पाहिजे, स्वभावदर्शन व्यक्तींच्या संवादातून करणे जास्त चांगले, अनुलोम पद्धतीपेक्षा निवेदनाची प्रतिलोम पद्धती चांगली, इत्यादी साहित्यशास्त्रातले सिद्धान्त साहित्यिकाला, अबोधपूर्व का होईना, पण ज्ञात असलेच पाहिजेत. त्यावाचून आपले साहित्य सारखे पाहून, त्याचा परिष्कार करणे त्याला शक्यच होणार नाही. त्याची प्रतिभा लेखनात आविष्कृत होते तशी समीक्षाशक्ती होणार नाही कदाचित. पण ती सतत प्रतिभेच्या साह्याला उभी असल्यावाचून नवनिर्मिती होणे शक्यच नाही.

 सौं. ४