पान:सौंदर्यरस.pdf/५३

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
४८
सौंदर्यरस
 

जीवन हाच काव्याचा विषय असला पाहिजे व काव्य हे साध्या नित्याच्या लोकभाषेत लिहिले पाहिजे असा त्याचा आग्रह होता. काव्य म्हणजे मानव व निसर्ग यांचे प्रतिबिंब असून सत्य हे त्याचे ध्येय असते, व ते सत्य भावनांच्या साह्याने मानवी हृदयापर्यंत पोचविणे हे कवीचे कार्य होय. ही वर्डस्वर्थची मते इंग्लिश काव्याच्या विकासाला उपकारक झाली असे साहित्यशास्त्राच्या इतिहासकारांचे मत आहे. कोलेरिज हा कवी खरा. पण 'बाॅयाॅग्राफिया लिटरारिया' हा त्याचा टीकाग्रंथ त्याच्या काव्याइतकाच मोलाचा मानला जातो. 'विविधतेतून एकरूप परिणाम साधण्याची शक्ती अशी त्याने प्रतिभेची व्याख्या केलेली आहे. मॅक्झिम गॉर्की हा रशियन साहित्यिक. 'मदर' हया त्याच्या कादंबरीची अक्षरसाहित्यात गणना होते. पण रशियात एक थोर साहित्यशास्त्रज्ञ म्हणूनही त्याची तितकीच कीर्ती आहे. 'समाजवादी वास्तववादाचा निर्माता' असा त्याचा मोलोटाव्ह याने गौरव केला आहे. रवीन्द्रनाथ ठाकुर यांची काव्यप्रतिभा व त्यांची समीक्षाशक्ती या सारख्याच समर्थ होत्या हे सुप्रसिद्धच आहे. सर्जनशक्ती व समीक्षाशक्ती या परस्पर व्यवच्छेदक आहेत. हा रूढ समज चुकीचा आहे असे मतही रवीन्द्रनाथ आवर्जून मांडीत असत. अशी किती म्हणून उदाहरणे द्यावी ! सर्वत्र उदाहरणेच आहेत. प्रत्येक देशातील थोर साहित्यिक प्रतिभा व समीक्षा या लक्ष्मी-सरस्वतीप्रमाणे निसर्गभिन्नास्पद नाहीत हेच दाखवीत आहेत. या दोन्ही शक्ती एकसंस्थ असणे हा अपवाद नाही. तसाच तो नियम नाही हे खरे; पण नियम आहे असे वाटण्याइतकी विपुल उदाहरणे सापडतील हेही तितकेच खरे आहे. म्हणूनच साहित्यिक व टीकाकार यांच्यात हाडवैर असणे साहजिक आहे, असा समज रूढ व्हावा, याचेच नवल वाटते.

 प्रतिभा व समीक्षा या एकठाय असतात असा नियम नाही असे वर म्हटले आहे. पण ते तितकेसे खरे नाही. एका दृष्टीने पाहता तसा नियम आहे, तसा नियम असल्यावाचून भागणार नाही, असे दाखविणे सहज शक्य आहे. आपण हे ध्यानात घेतले पाहिजे की, प्रत्येक साहित्यिक हा एक अव्वल दर्जाचा टीकाकार असतोच असतो. तसा तो असल्यावाचून त्याला अक्षर-साहित्य निर्माण करता येणारच नाही. तो साहित्यशास्त्रावर ग्रंथ लिहिणार