पान:सौंदर्यरस.pdf/५१

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
४६
सौंदर्यरस
 

होते. 'मारा, हाणा त्या कुत्र्याला. कारण तो टीकाकार आहे.' हे जर्मन महाकवी गटे याचे वचन अनेक लोकांचे आवडते वचन आहे. अठराव्या शतकातील कवी अलेक्झँडर पोप याने टीकाकारांची केलेली कुत्सित निंदा लोकांना अशीच सुखावह होते.
 तो म्हणतो, 'आपली मते आपल्या घड्याळासारखीच असतात. दोन मतांचा, त्याचप्रमाणे दोन घडयाळांचा कधी मेळ असावयाचा नाही. तरी प्रत्येकाला आपले मत व घड्याळ अगदी बरोबर आहे असे निश्चित वाटत असते. कवींमध्ये जशी प्रतिभा दुर्मिळ असते तशीच टीकाकारांत अभिरुची दुर्मिळ असते.'
 कोठल्याही दोन टीकाकारांचे एकमत कधी होत नाही. तेव्हा टीकेला शास्त्र म्हणणे अशक्य आहे, हा भावार्थ पोपने सूचित केला आहे.
 विख्यात फ्रेंच लेखक व्हॉल्टेअर याने आपल्या 'एसे ऑन एपिक पोएट्री' या निबंधात टीकाशास्त्राचा असाच उपहास केला आहे. तो म्हणतो, 'प्रत्येक कला यमनियमांच्या, शास्त्रांच्या भाराखाली वाकलेली आहे आणि हे नियम व ही शास्त्रे बहुतांशी तर्कदुष्ट व निरुपयोगी असतात. जगात जे जे म्हणून टीकाग्रंथ आहेत ते सर्व भाष्य, व्याख्या व केशविच्छेदन करून अत्यंत साध्या गोष्टी क्लिष्ट व दुर्बोध करून ठेवण्यात पूर्ण यशस्वी झाले आहेत.'
 जर्मन शास्त्रज्ञ हेगेल याने म्हटले आहे की, मनुष्याची प्रतिभा, त्याची कल्पनाशक्ती मंदावली की त्याची विवेचकशक्ती बळावते. यामुळे ज्याला प्रतिभा नाही तोच टीकाकार होतो. प्लेटो व अरिस्टॉटल हे साहित्यशास्त्रज्ञ टीकाकार होते. पण ते ग्रीक वैभवाचा काळ संपल्यावर उदयास आले. हे उदाहरण देऊन एक लेखक म्हणतो की, मालकाचा मृत्यू झाल्यावर त्याच्या रिकाम्या घरात त्याच्या जिंदगीची, त्याच्या पैशा अडक्याची मोजदाद करणारे विश्वस्त म्हणजेच हे टीकाकार होत. एकंदरीत उत्तरक्रिया करणे हे त्यांचे काम. सूर्य मावळल्यावर मग घुबडे संचार करू लागतात. तसेच टीकाकारांचे आहे.