पान:सौंदर्यरस.pdf/५०

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.






टीकाशास्त्र आणि
साहित्य-निर्मिती



 सामान्यतः लोकांत असा एक समज रूढ आहे की, टीकाकार व साहित्यिक यांचे संबंध अही- नकुलवत् असतात. त्या दोघांमध्ये हाडवैर असते व ते असणे साहजिकच आहे असे लोक मानतात. कारण साहित्यिक जे लिहितो त्याची चीरफाड करून त्यातील दोष दाखविणे हेच टीकाकाराचे जर काम आहे, तर त्या दोघांत सौहार्द असणे कसे शक्य आहे ? टोकाकाराची वृत्तीच मुळी शिकाऱ्यासारखी असते. शिकारी सावजाकडे पाहतो तसाच तो ललितकृतीकडे पाहात असतो, आणि तिचे निर्दाळण करून टाकण्यात त्याला शिकाऱ्यासारखाच आनंद प्राप्त होतो.
 लोकांत असा समज असतो आणि अनेक साहित्यिकांनी टीकाकाराची अशाच शब्दांत संभावना केलेली असल्यामुळे तो जास्तच दृढ होतो. या सामन्यात लोक बहुधा साहित्यिकाच्या बाजूचे असतात. कारण त्यांना टीकावाङ्मयाची मुळीच आवड नसते. काव्य, कादंबरी, नाटक यांत त्यांचे मन रमते आणि पुष्कळ वेळा त्यांच्या आवडत्या लेखकांवरही टीकाकार तुटून पडलेले त्यांना दिसतात. साहजिकच त्यांना त्यांचा राग येतो. आणि म्हणून, साहित्यिकांनी टीकाकारांची हेटाळणी केली तर ती त्यांना प्रिय