पान:सौंदर्यरस.pdf/४८

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
सौंदर्याचे विश्लेषण
४३
 

कादंबरीतील व्यक्तिचित्रणाचा विचार केला आहे. असे करताना या व्यक्तींच्या मागची वैचारिक पार्श्वभूमी कोणती होती व प्रत्येक व्यक्तीच्या अंतरंगाचे दर्शन घडवून लेखिकेने प्रादेशिक जीवनाचे दर्शन घडविण्याचा आपला हेतू कसा साधला आहे तेही अंडरसन यांनी विवरून दाखविले आहे. लेखिकेचे वैयक्तिक चरित्र सामाजिक नीतीच्या दृष्टीने आक्षेपार्ह होते. त्याचा या कादंबरीतील घटना, व्यक्ती यांवर कसा परिणाम झाला आहे, काही ठिकाणी आत्मसमर्थनाचा हेतू कसा स्पष्ट दिसून येतो, तेही समीक्षकांनी या समीक्षेत स्पष्ट केले आहे. (फ्रॉम डिकन्स टु हार्डी- पेलिकन गाइड टु इंग्लिश लिटरेचर- १९५८) या मालेतील शेले, जॉर्ज मेरिडिथ यांच्या साहित्याचे समीक्षण पाहिले तरी ते अशाच विश्लेषणात्मक पद्धतीने केलेले आहे असे आढळून येईल.
 सौंदर्याचे विश्लेषण, लालित्याचे पृथक्करण हे शब्द आपल्या कानाला चमत्कारिक लागतात. पण सौंदर्याचा आस्वाद व सौंदर्याचे परीक्षण यातील भेद जर आपण जाणू शकलो तर यात चमत्कारिक काहीच नाही असे आपल्या ध्यानात येईल व मग ललितकृती एकसंध असते म्हणून तिचे परीक्षणही एकसंध पद्धतीने केले पाहिजे हा भाबडा, भोळा युक्तिवाद आपण क्षणमात्रही करणार नाही. आपण हे लक्षात ठेवले पाहिजे की, सौंदर्याच्या किंवा लालित्याच्या निर्मितीलाही पृथक्करणशक्तीची आवश्यकता असते. मायकेल एंजलोचे उदाहरण वर दिलेच आहे. पण कोणाचेही उदाहरण घेतले तरी हेच दिसून येईल. निग्रो गुलामांच्या जीवनाचे दर्शन सौ. स्टोवे यांना अमेरिकन जनतेला घडवावयाचे होते. त्या वेळी प्रथम त्या जीवनाचे मनात त्यांनी पृथक्करण केले असलेच पाहिजे. त्या जीवनाचे भिन्नभिन्न घटक ध्यानात घेऊन त्यांनी तशा तशा प्रातिनिधिक व्यक्ती निर्माण केल्या आणि 'अंकल टॉम्स केबिन' या कादंबरीत एक एकसंध जीवनाकृती निर्माण केली. आपल्या काळच्या स्त्रीजीवनाची आकृती हरिभाऊंना निर्माण करावयाची होती. त्यासाठी बालविवाह, बालावृद्ध-विवाह, स्त्रीचे अज्ञान, तिची परतंत्रता, सासुरवास, या स्त्रीजीवनाच्या भिन्न समस्या डोळयांपुढे ठेवूनच तशा तशा स्त्री रेखा त्यांनी उभ्या केल्या व स्त्रीजीवनाचे समग्र दर्शन घडविले. ललित लेखकाला मनाचे विश्लेषण करावे हे सर्वमान्यच आहे. गहू, तांदूळ