पान:सौंदर्यरस.pdf/४४

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
सौंदर्याचे विश्लेषण
३९
 

कादंबरी, लघुकथा या सर्व प्रकारची उदाहरणे घेऊन त्यांनी तो सिद्ध करावयास हवा होता. पण त्यांनी एक-दोन भावगीतांच्या उदाहरणावर भागविले. आणि तेही त्यांच्या रचनेचा पुरा शोध न घेता ! माझी अशी खात्री आहे की, आपल्या नवीन साहित्यविषयक सिद्धान्तांची मांडणी करताना मर्ढेकरांनी सर्व वाङ्मयप्रकाराची विपुल उदाहरणे देऊन लेख लिहिण्याची पद्धत ठेवली असती तर निम्म्याच्यावर लेख त्यांनी लिहिलेच नसते. त्या कल्पनांचा साहित्याच्या टीकेत विनियोग करू लागताच त्यातला भ्रांतिष्टपणा त्यांच्या ध्यानात आला असता. पण दुर्दैवाने तसे झाले नाही आणि त्यांनी हवेत सोडून दिलेल्या कल्पनांवरच आजचे मराठी टीकाशास्त्र तरंगत आहे. मर्ढेकरांनी आधारप्रमाणांनी अर्वाचीन पद्धतीने, विवेचन केले असते तर 'भावनात्मक लयांची केन्द्रपूर्ण आकृती' म्हणजे काय ते स्पष्ट झाले असते. मग तिचे परीक्षण एकसंध करावयाचे की अवयवशः, त्यातील अधिक उद्बोधक कोणते, ते निश्चित ठरविता आले असते. परंपरागत टीकासंप्रदाय, ते कोणाला म्हणतात तेही मग कळले असते. प्लॉट, कॅरॅक्टर, इमेजरी हे इंग्रजी शब्द त्यांनी वापरले आहेत. त्यावरून अर्वाचीन पाश्चात्त्य टीकाकारही रोमँटिसिझमच्या उदयानंतरचे टीकाकारही समीक्षा करताना ललितकृतीचा एकसंधपणा ध्यानात घेत नव्हते, असे त्यांना म्हणावयाचे आहे की काय अशी शंका येते. तसे ते म्हणतील असे वाटत नाही. वा. ल कुलकर्णी यांनीही आजच्या नव्या जबाबदार टीकाकारांची लक्षणे सांगताना एकाही टीकाकाराचा उल्लेख केला नाही. त्याच्या टीकेच्या नव्या लक्षणांची उदाहरणे देऊन चर्चा केली नाही. प्रत्यक्ष साहित्याशी संबंध येऊ न देता बेकनपूर्व जुनाट पद्धतीने केलेले हे विवेचन हवेतून जमिनीवर उतरतच नाही. ते उतरावे म्हणून त्यांनी स्वतः केलेल्या टीका पहाव्या तर त्या विश्लेषण- पद्धतीनेच केलेल्या आहेत, असे दिसते.

 म्हणून पुन्हा एकदा खुलासा करावासा वाटतो की, ललितकृतीचे एकसंधत्व कोणीही अमान्य केलेले नाही. टीकाकारांनी परीक्षण करताना याचा कधीही विसर पडू देता कामा नये हे खरेच आहे. पण म्हणून समीक्षाही एकसमयावच्छेदेकरून करावी ही कल्पना प्रान्त आहे. या बाबतीत