पान:सौंदर्यरस.pdf/४३

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
३८
सौंदर्यरस
 

 कलाकृतीच्या एकसंधत्वावर, एकजीवित्वावर हा आक्षेप नाही. ते एकजीवित्व रसिकांच्या मनापुढे उभे करणे हेच टीकाकाराचे कार्य, याबद्दल वाद नाही हे एकसंधत्व प्रतीत करून देण्यासाठी समीक्षाही तशीच एकसंध- पद्धतीने केली पाहिजे, हा जो नवटीकेचा आग्रह त्यावर हा आक्षेप आहे. मर्ढेकरांनी म्हटले आहे की, 'वाङ्मयकृती ही संभवनीय घटनांची सरळ माळ नसते. माळेतील एक-एक मण्याची जशी आपल्याला जाणीव होते तशी वाङ्मयकृतीतील आशयाची होत नाही. तर भावनात्मक लयांची ही आकृती एकमयावच्छेदेकरून आपणांस प्रतीत होत असते.' साहित्यकृती रसिकास या प्रकारे प्रतीत होते, याबद्दल वाद नाही. तशी ती झाली तरच तिचे खरे सौंदर्य त्यांना समजेल हे खरे. पण प्रतीती निराळी आणि परीक्षण निराळे. वाङ्मयकृती ही भावनात्मक लयांची केंद्रपूर्ण आकृती असते, हे जरी खरे असले तरी तिचे परीक्षण 'प्लॉट, कॅरॅक्टर, डिक्शन, इमेजरी' यांचे विच्छेदन करूनच होणे अवश्य आहे. याच लेखात मर्ढेकरांनी एके ठिकाणी म्हटले आहे की, याच प्लॉट, कॅरेक्टर वगैरेच्या कल्पना जर थोड्या अधिक सयुक्तिक अशा तत्त्वांना अनुसरून वापरल्या तर त्यांच्यातील परंपरागत दोष टाळता येणे शक्य आहे ही अधिक सयुक्तिक तत्त्वे कोणती व त्यांना अनुसरून या कल्पना कशा वापरावयाच्या, याचा खुलासा मर्ढेकरांनी केलेला नाही. खरे म्हणजे मर्ढेकरांनी कसलाच खुलासा केलेला नाही. ललितकृतींच्या घाटासंबंधीच्या ॲरिस्टॉटलपासून परंपरेने चालत आलेल्या कल्पना रद्द ठरवून 'भावनात्मक लयाची' आपली कल्पना मांडताना दहा-पाच कादबऱ्या, काही नाटके, काही भावगीते यांची उदाहरणे घेऊन त्यांना ती लावून दाखविणे अवश्य होते. पण उदाहरणे देण्याची मर्ढेकरांची रीतच नाही. प्रा. वा. ल. कुलकर्ण्यांचीही नाही फ्रॅन्सिस बेकनच्या पूर्वीच्या जुनाट काळात हे दोघे वावरत आहेत, असे त्यांचे लिखाण वाचीत असताना वाटते. प्रत्यक्ष जीवनाशी संबंध न येऊ देता तर्कावरून तर्क लढवीत बसणे, ही त्या वेळची रीत होती. मर्ढेकरांनी तीच अवलंबिलेली आहे. लेखनपूर्व आत्मनिष्ठा, लेखनगर्भ आत्मनिष्ठा, भावनानिष्ठ समतानता या आपल्या कल्पना त्यांनी अशाच मांडल्या आहेत. आत्मनिष्ठेचा विचार सर्वस्वी नवीन असा त्यांना मांडावयाचा होता. तेव्हा नाटक,