पान:सौंदर्यरस.pdf/४२

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
सौंदर्याचे विश्लेषण
३७
 

होत आहे. मनुष्याच्या शब्दांना अर्थ असावा ही समाजाची पहिली गरज, पण हेच या साहित्यिकांना मान्य नाही. भाषा हा समाजजीवनाचा पाया आहे. एकाचे मनोगत दुसऱ्याला कळविणे यावर सर्व मानवी संस्कृती उभी आहे. पण या पायाभूत शक्तीवरच साहित्यिक घाव घालीत आहेत आणि नवी टीका त्याचे समर्थन करीत आहे; दुर्बोधत्व हेच आमचे व्यवच्छेदक लक्षण म्हणून भूषण मिरवीत आहे कविवर्य कुसुमाग्रज यांनी 'साहित्यातील आग्रह आणि दुराग्रह' या आपल्या भाषणात असल्या अनेक अपप्रवृत्तींवर टीका केली आहे. एका कवीने त्यांना आपली कविता वाचावयास दिली. ती वाचून त्यांनी तिच्यावर बरा अभिप्राय दिला चांगल्या काव्यलेखनाची शक्यता यातून दिसते, असे त्याला सांगितले, यावर तो अगदी भकास हसला. या कविता अगदी टाकाऊ आहेत असे, तोच म्हणाला. कारण काय ? तर आपल्या प्रत्येक काव्याच्या प्रत्येक ओळीतून काही अर्थ निष्पन्न होतो, याचे त्याला दुःख होत होते ! काव्याला अर्थ असणे हा महादोष, तसाच सामाजिक जीवनाशी त्याचा संबंध असणे हा दुसरा दोष ! कारण मग ती कविता प्रचारक आहे, असे होईल. कुसुमाग्रज म्हणतात, आजच्या सोवळ्या साहित्यात प्रचार ही वस्तू फारच भयानक मानली जाते. समाजजीवनापासून अलिप्त राहण्याच्या या वृत्तीतूनच साहित्यिक हा नीतिबाह्य आहे हे मत निर्माण झाले आहे. कुसुमाग्रज या अलिप्ततेला कबरस्तान म्हणतात साहित्यिक स्वतःला या कबरस्तानात कोंडून घेत आहेत. प्रा. वा. ल. कुलकर्णी यांनी 'आजची मराठी कविता' या आपल्या भाषणात, श्रेष्ठ विचारानुभवातून प्रकट झालेली कविता आज क्वचितच पहावयास मिळते अशी तक्रार केली आहे. त्याचप्रमाणे खऱ्याखुऱ्या चिंतनशील प्रतिमेचा आज अभावच दिसतो असेही ते म्हणतात. म्हणजे आजच्या साहित्याचा ओघ कोणीकडे चालला आहे ? शब्दांना अर्थ असणे वाईट, आपले मनोगत दुसऱ्यांना कळणे निषिद्ध, समाजजीवनाशी संबंध असणे हे महापाप, नीति-अनीतीचा विचार वर्ज्य, श्रेष्ठ विचारानुभवाचे महत्त्व नाही व चिंतनशीलतेचा अभाव आहे !

 याच्याच जोडीला पृथक्करणशक्तीची निर्भर्त्सना- ही वृत्ती आणून ठेविली की समाजाच्या सर्व जीवनशक्तींना पोखरून टाकण्याचे आजच्या साहित्याचे उद्दिष्ट पुरे होईल, असे वाटते.