पान:सौंदर्यरस.pdf/४१

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
३६
सौंदर्यरस
 

सूक्ष्म निरीक्षण, अभ्यास हे कलाकारालाही अवश्य आहे आणि अवलोकन आले की पृथक्करण, विश्लेषण, विच्छेदन हे अटळ आहे.
 टीकाकारालाही ललितकृतीचे अवलोकन करावयाचे असते. समीक्षा हे शास्त्र आहे. आज टीका ही नवनिर्मिती आहे, असे एक मत रूढ आहे. त्याला अर्थ आहे, पण तो फार मर्यादित. प्रामुख्याने समीक्षा हे शास्त्रच आहे. रसिकाने केवळ आस्वाद घेणे, कलाकृतीचा आनंद अनुभणे हे शास्त्र नव्हे त्यामुळे तेथे पृथक्करणाचा संबंध येत नाही. पण टीका समीक्षा हे कलाकृतीच्या रहस्याचे विवेचन आहे. ते शास्त्राच्या कक्षेतच येणार. नाही तर वैयक्तिक मतापलीकडे साहित्यसमीक्षेला कसलीच प्रतिष्ठा प्राप्त होणार नाही. म्हणून काही मूल्ये, काही निकष निश्चित करून शास्त्रीय दृष्टीने साहित्याकडे पाहणे हेच समीक्षकाचे कार्य आहे. आणि शास्त्रीय दृष्टी म्हटल्याबरोबर घटकपृथक्करण हे अनिवार्य आहे. त्यावाचून अवलोकन, निरीक्षण, अभ्यास याला कसलाही अर्थ नाही.
 तेव्हा ललितकृती ही एकसंध आहे म्हणून परीक्षणही एकसंध असावे ही कल्पना भ्रान्त आहे.
 आणि ती नुसती भ्रान्त आहे एवढेच नव्हे, तर समाजविघातक आहे. पृथक्करण करण्याची शक्ती ही मानवी मनाची फार मोठी शक्ती आहे. प्रत्येक मनुष्याला ती थोड्याफार प्रमाणात अवश्यच असते. शास्त्रज्ञाला तिची फारच जरूर असते. आणि माझ्या मते तिची तितकीच जरूर कलाकाराला असते. मानवी जीवन पाहून, अवलोकून, त्याला काव्य, कादंबरी लिहावयाची असते. हे जीवन पाहताना मानवी मनाचा त्याला सखोल अभ्यास करावयाचा असतो हा अभ्यास त्या मनाचे विश्लेषण केल्याशिवाय कसा शक्य आहे? चित्रकार, शिल्पकार, मूर्तिकार यांना देहाचे विश्लेषण करणे जितके अवश्य, तितकेच साहित्यिकाला मनाचे पृथक्करण अवश्य आहे. अर्थ असा की, पृथक्करणाचे सामर्थ्य हे एक संस्कृतीचे लक्षण आहे. आणि नवटीकेचे पुरस्कर्ते त्याच्यावरच आघात करीत आहेत.
 आणि नवसाहित्यात ज्या अनेक अपप्रवृत्ती, समाजविघातक कल्पना निर्माण झाल्या आहेत त्यांशी हे सुसंगतच आहे. समाजाच्या सर्व महत्त्वाच्या व श्रेष्ठ शक्तींची चेष्टा करावी, विटंबना करावी, अशीच साहित्याची प्रवृत्ती