पान:सौंदर्यरस.pdf/४०

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
सौंदर्याचे विश्लेषण
३५
 

हाच तो अर्थ. याशिवाय दुसऱ्या कोणत्याही पद्धतीने परीक्षण करणे शक्यच होणार नाही. ती कल्पनाच भ्रांतिष्ट आहे. ललितकृती एकसंध असते तशा सृष्टीतल्या अनंत वस्तू एकसंध असतात त्यांचेही परीक्षण एकसंधपद्धतीने, घटकांचे पृथक्करण न करता करावयाचे म्हटले तर अनर्थच होईल. मानवी संसारात आजपर्यंत जी शास्त्रे निर्माण झाली त्यांचा पाया पृथक्करण हाच आहे. मानवाचा देह हा तर एकसंध आहे ना ? ती सृष्टीची सर्वश्रेष्ठ ललितकृती मानली जाते. पण त्या देहाची चिरफाड करून त्याचे घटक घटक व त्यांचेही उपघटक पृथक् केले नव्हते तोपर्यंत या श्रेष्ठ कलाकृतीचे रहस्य कोणालाच उमगले नव्हते. मायकेल एंजलो हा जगद्विख्यात चित्रकार व शिल्पकार होता. त्याच्या कलाकृती अद्वितीय मानल्या जातात. पण हे अलौकिक यश त्याला कशामुळे प्राप्त झाले ? स्मशानभूमीतून चोरून प्रेते आणून त्यांची चीरफाड करून मानवी देहाच्या घटकांचा त्याने सूक्ष्म अभ्यास केला म्हणून त्याला निर्मिती करावयाची होती ती एकसंध कलाकृतीची. मानवाच्या चित्राची, मूर्तीची ! पण त्यासाठी त्याला घटक-पृथक्करण करावे लागले. अशा पृथक्करणावाचून समग्र दर्शन होणे शक्य नाही, असाच याचा अर्थ होतो. वैद्यकशास्त्राला देहाचे पृथक्करण करावे लागतेच, पण कलाकारालाही करावे लागते. हे यावरून कोणालाही मान्य करावे लागेल सृष्टीत अनंत वस्तू आहेत. धान्याचे दाणे आहेत. वृक्षांची फळे आहेत, फुले आहेत, लता आहेत, निर्झर आहेत, हिरवळ आहे, चंद्र-सूर्य-तारे आहेत शास्त्रज्ञांना यांचे ज्ञान हवे असते. ते ज्ञान पृथक्करणावाचून कधीही मिळत नसते रसायन पदार्थविज्ञान, यांची उभारणी पृथक्करणावाचून होणे शक्यच नाही पृथक्करण हा त्या शास्त्रांचा आत्मा आहे. आणि मायकेल एंजलोच्या कलाकृतींचे रहस्य ध्यानात आले असेल, तर कलावंतालाही या ज्ञानाची आवश्यकता आहे हे आपल्याला सहज पटेल. त्यालाही सृष्टीचे वर्णन करावयाचे असते. त्याचे वर्णन भावनात्मक, कल्पनात्मक असते, हे खरे. पण सृष्टीच्या सूक्ष्म अवलोकनावाचून त्याला हे करता येणार नाही. मराठीतल्या पंडित कवींनी असे अवलोकन न करता सृष्टिवर्णने केली. त्यामुळे त्यांची सृष्टी कशी झाली, हे साहित्याच्या अभ्यासकांना माहीतच आहे. तेव्हा अवलोकन,