पान:सौंदर्यरस.pdf/३८

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
सौंदर्याचे विश्लेषण
३३
 

 ना. सी. फडके यांनी खाडिलकर, देवल, गडकरी यांच्या नाट्यकृतींची परीक्षणे केली आहेत. तीही अशीच आहेत. त्यात नाटककाराच्या व्यक्तित्वाचा अभ्यास आहे, त्याच्या कलाकृतीचे समग्र दर्शन आहे, आणि हे सर्व कलागुणांचे पृथक्करण करून साधले आहे. 'जे आपल्याला आवडते त्याचा पुरस्कार करण्याची व जे नावडते त्याचा धिक्कार करण्याची जबर इच्छा ज्याला असते व या अंतःप्रेरणेने प्रवृत्त होऊन जो लिहितो तोच खरा जिवंत साहित्यिक' असे म्हणून देवलांच्या 'शारदेचा जन्म' या प्रेरणेतूनच कसा झाला आहे, ते पुढच्या समीक्षेत फडक्यांनी दाखविले आहे आणि 'स्त्री'वरचा जो अन्याय पाहून देवलांना हो नाट्यकृती स्फुरली त्याच्या मूर्तीकरणाच्या दृष्टीने नाट्याचे व्यक्तिदर्शन, कथानक, संवाद, संगीत हे प्रत्येक अंग कसे अनुकूल आहे, पोषक आहे याचे सोदाहरण विवेचन केले आहे.
 गडकऱ्यांवरील व्याख्यानांत त्यांनी याचप्रमाणे गडकऱ्यांच्या नाट्यसृष्टीचे 'सकलदर्शन' घडविले आहे. आणि त्याचबरोबर गडकऱ्यांच्या व्यक्तित्वातून ही नाट्यसृष्टी कशी निर्माण झाली तेही विवरून सांगितले आहे. चमत्कृतीची हौस, अद्भुताची आवड, हा गडकऱ्यांच्या प्रकृतीचा स्थायीभाव आहे हे सांगून, त्यांच्या नाटकांची कथानके, त्यांतील स्त्री पुरुष व्यक्तिरेखा, त्यांतील भाषा या आवडीतून कशी निर्माण झाली ते फडके यांनी दाखवून दिले आहे. संभाव्य- असंभाव्यतेचा विचार गडकरी केव्हाही करीत नाहीत प्रत्येक ठिकाणी अतिरेक, अत्युक्ती हेच त्यांचे लक्षण ! सर्व अतिरंजित. त्यांच्या नाटकात कमालीचे शोककारक प्रसंग आहेत आणि फडक्यांच्या मते शोक ही गडकऱ्यांची खरी शक्ती आहे. पण तरीही त्यांच्या शोकपर्यवसायी नाटकांना शोकांतिकेची भीषण नाट्याची प्रतिष्ठा प्राप्त होत नाही कारण त्यातील घटनांत अपरिहार्यता मुळीच नाही.
 फडके म्हणतात, लेखकाच्या लेखामागे त्याची अंतःप्रवृत्ती त्याचे मनोधर्म, त्याचे विशिष्ट मनोव्यापार त्याच्या मनाची बैठक, त्याचे अनुभव, त्याचा दृष्टिकोन ही सर्व असतात, आणि यांतूनच त्याची साहित्यसृष्टी निर्माण होते. या तत्त्वाला अनुसरून फडक्यांनी गडकऱ्यांच्या नाटकांचे

 सौं ३