पान:सौंदर्यरस.pdf/३७

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
३२
सौंदर्यरस
 

सर्व लोक नीच, अधम असे दाखविले आहेत. हरिहरशास्त्री हे जे मुख्य विरोधक त्यांनी विरोधी पक्षाचा म्हणून जो युक्तिवाद मांडला आहे, तो सनातन्यांनाही किळसवाणा व हिडीस वाटेल असा आहे त्यामुळे त्यांच्या प्रतिकूलतेस काहीच किंमत नाही. त्यानंतर विहार, तरंगिणी, चंद्रिका या व्यक्तिरेखांचा विचार तात्यासाहेबांनी केला आहे. विहार हा पुनर्विवाहाचा विरोधक. त्याची बहीण चंद्रिका ही विधवा होती. तिच्या पुनर्विवाहास त्याचा विरोध होता. पण, 'मी विधुर झालो आणि मी पुनर्विवाह केला तर मी चंद्रिकेच्या विवाहास परवानगी देईन,' असे तो म्हणतो. पुढे काही अकल्पित घटना घडवून कोल्हटकरांनी तो विधुर होतो, पुनर्विवाह करतो व बहिणीला परवानगी देतो, असे दाखविले आहे. त्यावर तात्यासाहेब म्हणतात, 'विहारची फजिती हा पुनर्विवाह-पक्षाचा आधार योग्य नाही. समाज वश करण्याचे चेष्टा हे साधन नव्हे. अशाने समाज वळत नाही. त्याच्या न्यायबुद्धीला, करुणाबुद्धीला आवाहन करावयास हवे.'
 सबंध ललितकृती ही एकसंध आहे, तिचा काही हेतू आहे व त्याचे अनुसंधान समीक्षा करताना सुटता कामा नये हे तात्यासाहेब चांगले जाणतात हे, मतिविकाराचे परीक्षण वाचताना सारखे प्रत्ययास येत असते. येवढेच नव्हे तर कोल्हटकरांची एकंदर नाट्यसृष्टी त्यांच्या डोळ्यांसमोर आहे, आणि त्या नाटककाराचे व्यक्तित्व, त्याची प्रतिभा, त्याची नाट्यकला या सर्वांच्या संदर्भात या नाटकाचे परीक्षण तात्यासाहेब करीत आहेत हेही प्रारंभापासून दिसते. 'गुप्तमंजूष' या नाटकात स्त्री-शिक्षणाचा पुरस्कार आहे, 'वीरतनया'त विधुरविवाह आहे. 'मूकनायका'त मद्यपान निषेध आहे. यांपैकी कुठल्याच नाटकात मूळचा हेतू नीटसा साधलेला नाही, असे केळकरांनी म्हटले आहे. तेव्हा समीक्षेमध्ये सर्व नाट्यकृती डोळ्यापुढे उभी रहावी, इतकेच नव्हे तर तो नाटककारही दिसावा, असेच धोरण समीक्षकांचे होते हे स्पष्ट आहे. पण हे दर्शन घडविताना तात्यासाहेबांनी अवयवशः परीक्षण केले आहे त्याचे विवेचन करण्याची अर्थातच येथे जरूर नाही. कारण ते तसे परीक्षण करतात हा तर त्यांच्यावर 'आरोप' आहे. तसे करूनही कलाकृतीचे एकसंध दर्शन ते घडवू शकले, हे ध्यानात घेतले पाहिजे.