पान:सौंदर्यरस.pdf/३६

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
सौंदर्याचे विश्लेषण
३१
 

गुण मूळ कविप्रवृत्तीतले असतात. रंग, सुवास, आकार हे गुण म्हणजे फूल नव्हे. त्याचप्रमाणे कल्पकता, उपरोध, मिस्किलपणा हे गुण म्हणजे कथा नव्हे. म्हणून फुलाचे सौंदर्य लक्षात घेताना त्याच्या गुणांचा पृथक् विचार करणे जसे अयुक्त, तसेच कथेच्याही बाबतीत असले पाहिजे. समग्र रूपाचा एकदम विचार केला पाहिजे पण तसा कुलकर्णी यांनी केलेला नाही. 'टीका : काल, आज व उद्या' या लेखात तसे मत मांडूनही प्रत्यक्ष परीक्षण करताना त्यांनी दर ठिकाणी अवयवशःच परीक्षण केले आहे.

 असे का व्हावे ? याचे कारण अगदी उघड आहे. कलाकृती एकसंध असते म्हणून तिचे परीक्षण एकसंध व्हावे, ही कल्पनाच मुळी भ्रान्त आहे. तसे परीक्षण करणे केव्हाही शक्य नाही. समीक्षकांना कलाकृतीच्या एकसंधपणाची जाणीव असली पाहिजे. ते ध्यानात ठेवूनच तिच्या आत्म्याशी सर्व घटक सुसंगत कसे आहेत हे त्यांनी दाखविले पाहिजे. वाचकांच्या मनापुढे, रसिकाच्या दृष्टीपुढे परीक्षण वाचल्यानंतर त्या ललित कृतीचे समग्ररूप उभे राहिले पाहिजे, त्यांना सकलदर्शन झाले पाहिजे, हा आग्रह युक्त आहे. वामनराव जोशी, तात्यासाहेब केळकर, ना. सी. फडके या साहित्यसमीक्षकांना हा आग्रह सर्वस्वी मान्य होता. त्यांनी जी समीक्षा केली ती याच धोरणाने केली. आजचा परीक्षणकार कोणत्याही ललितकृतीकडे पाहताना प्रथम ती ललितकृती जे रूप घेऊ पहात आहे ते रूप घेणे व ती जे व्यक्त करू पहात आहे ते व्यक्त करणे तिला कितपत साधले आहे हे लक्षात घेण्याचा प्रयत्न करीत आहे, असे वा. ल. कुलकर्णी म्हणतात. पण यात नवीन काही नाही. जुन्या टीकाकारांनी हेच केले आहे. तात्यासाहेब केळकर यांनी केलेले 'मतिविकार' या श्री. कृ. कोल्हटकरांच्या नाटकाचे परीक्षण पहा. हे नाटक लिहिण्यात कोल्हटकरांचा जो हेतू होता तो त्यातून सिद्ध होत नाही, असा आक्षेप घेऊनच केळकरांनी समीक्षेला प्रारंभ केला आहे. विधवाविवाहाचे समर्थन करणे, हा कोल्हटकरांनी हेतू म्हणून सांगितला आहे. पण नाटकात त्यांनी विरोधी पक्षाची बाजू अत्यंत हीन करून मांडली आहे. त्या पक्षाचे