पान:सौंदर्यरस.pdf/३५

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
३०
सौंदर्यरस
 

अगदी भ्रान्त कल्पना आहे. स्वतः प्रा. वा. ल. कुलकर्णी यांनी केलेली एक दोन परीक्षणे पाहिल्यावर तर याविषयी कोणालाही शंका उरणार नाही.

 'जिप्सी' या पाडगावकरांच्या कवितासंग्रहाला कुलकर्णी यांनी प्रस्तावना लिहिली आहे. त्या प्रस्तावनेत त्यांनी त्यांच्या प्रतिभेच्या स्वरूपाचे परीक्षण करताना तिचे भिन्न घटक अलग करूनच विवेचन केले आहे. प्रथम त्यांनी बालकवींप्रमाणेच पाडगावकर निसर्गात सहजतया कसे रंगून गेले आहेत, ते सांगितले. नंतर त्यांच्या काव्यातील शब्दचित्रांचा विचार केला, व ती शब्दचित्रे ज्या प्रतिमा आपल्या डोळ्यापुढे निर्माण करतात त्या निसर्गविभ्रमाच्या व त्याचप्रमाणे कविमनाच्याही प्रतिमा आहेत, हे दाखवून दिले. मग पाडगावकर विविध भाववृत्तींची चित्रे काढण्यात कसे निपुण आहेत, हे सांगण्यासाठी 'क्षणपुष्पांच्या सरी', 'संथ निळे पाणी', 'शांत किनारा', 'रात्र भिजली' इत्यादी कवितांचा त्यांनी निर्देश केला. हे झाल्यावर पाडगावकरांच्या प्रेमकवितांचे कुलकर्ण्यांनी परीक्षण केले आहे. प्रेमभावनेतील जोश, तिने निर्माण होणारी हुरहूर, तिची अबोधता, मुग्ध आणि विमुक्त या दोन्ही वृत्तीचा या भावनेच्या अधिराज्यात येणारा सुखद अनुभव, या सर्वांत सामावलेलं भावसौंदर्य पाडगावकरांची कविता व्यक्त करू शकले, असे वा. ल. कुलकर्णी यांचे मत आहे. शेवटी, पाडगावकरांच्या प्रतिभेला भावजीवनाच्या पलीकडे असणाऱ्या अनंत अनुभव-विश्वाचे दर्शन अद्याप व्हावयाचे आहे, तसे झाल्यावर श्रेष्ठ, श्रेष्ठतर विचारानुभवांचे दर्शनही ती आपणांस निश्चित घडवील असा आशावाद प्रकट करून समीक्षकांनी हे परीक्षण संपविले आहे.

 ऑक्टोबर १९५४ च्या 'सत्यकथे' च्या अंकात प्रा. वा. ल. कुलकर्णी यांनी सदानंद रेगे यांच्या 'काळोखाची पिसे' या लघुकथा- संग्रहाचे परीक्षण केले आहे त्यात रेगे यांचे वातावरणनिर्मितीचे कौशल्य, लोकविलक्षणाचे त्यांना असलेले आकर्षण, त्यांची कल्पकता, त्यांच्या लेखणीतला उपरोध, त्यांच्या प्रतिभेत असलेली मिस्किलपणाची छटा इत्यादी गुणांचे त्यांनी क्रमवार वर्णन केले आहे. त्या कथांचे अवयवशः परीक्षण केले आहे. वास्तविक हे सर्व गुण कथेशी एकजीव झालेले असतात कारण ते