पान:सौंदर्यरस.pdf/३२

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
सौंदर्याचे विश्लेषण
२७
 

व्हावा असा त्यांचा प्रयत्न आहे. पण हे करताना प्रत्येक घटक निराळा करून तो या स्वप्नरंजनाला कसा पोषक आहे हे दाखवावे अशीच पद्धत त्यांनी अवलंबिलेली आहे. मला वाटते, इतर कोणत्याच पद्धतीने हे करता आले नसते.

 'लिलीचे फूल' या गंगाधर गाडगीळांच्या कादंबरीची समीक्षा- प्रा. गं. ब. ग्रामोपाध्ये यांनी केली आहे. (महाराष्ट्र साहित्य पत्रिका, ऑक्टो. डिसेंबर १९५५) तीही अशी विश्लेषणात्मकच आहे. प्रथम ग्रामोपाध्ये कादंबरीचा विषय सांगतात. एखाद्या मुलीवर अल्पवयात बलात्कार झाला तर रतिक्रीडेविषयी तिच्या मनात घृणा निर्माण होऊन रतिसुखाला ती पारखी होते, हे मानसशास्त्रीय प्रमेय हा तो विषय. मग हा विषय ज्या पात्रांच्याद्वारे गाडगीळांनी मूर्त केला आहे- करण्याचा प्रयत्न केला आहे- ती नीला व मुकुंद ही पत्रे, त्यांचे स्वभावविशेष, त्यांची भेट, सहवास, प्रेम इत्यादी यानंतर गाडगीळांनी कथानकाला अचानक कलाटणी देऊन कादंबरीला सनसनाटी बलात्कार-कथेचे स्वरूप दिल्यामुळे ती पूर्ण अपयशी कशी झाली आहे, हे ग्रामोपाध्यांनी दाखवून दिले आहे. हे परीक्षण करीत असताना मुळात शोकांतिकेची बीजे कथानकात असूनही, काही काळ शोककथेचा कलात्मक विकास झाला असूनही पुढे तिचा विचका कसा झाला हे ग्रामोपाध्यांनी स्पष्ट केले आहे. म्हणजे कादंबरीचे एकसंधत्व, एकजीवित्व त्यांना मान्य आहे. मूळ बीज वा त्याचा विकास अशी कादंबरी ही एक सजीव कलाकृती असते, याबद्दल त्यांचा मतभेद नाही. तो विकास प्रथम साधत कसा गेला व नंतर बिघडत कसा गेला हेच त्यांना परीक्षणात दाखवावयाचे आहे. पण असे करताना विषय, पात्रे, वातावरण, कथानक, पात्रांचे स्वभाव व कथानकातील घटना यातील सुसंगती- विसंगती, याच पद्धतीने त्यांनी परीक्षण केले आहे. आणि असे अवयवशः परीक्षण केल्यामुळेच कादंबरीचे समग्र रूप आपल्या डोळ्यांपुढे उभे राहते. हे रूप उभे करताना लेखकाच्या मनातील गोंधळाचेहीं ग्रामोपाध्यांनी विवरण केले आहे. साहित्याचे परीक्षण करताना साहित्यिकाचेही परीक्षण करणे अवश्य असते, असा अलीकडे दंडक आहे. त्याप्रमाणे टीकाकारांनी माणसाच्या