पान:सौंदर्यरस.pdf/३१

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
२६
सौंदर्यरस
 

अण्णासाहेबांनी सांगली-मिरजेकडच्या एखाद्या संयुक्त कुटुंबातील मुलीच्या लग्नाच्या प्रसंगाचे रूप दिले आहे असे गाडगीळांचे मत आहे. कथानकाचा विचार झाल्यावर मग गाडगीळांनी पात्रांचा विचार केला आहे व महाभारतातील पात्रांचा मनस्वीपणा किर्लोस्करांनी अगदी बोथट करून टाकला आहे. ही पात्रे मवाळ आहेत, बावळी आहेत, बालबोध आहेत, कोमट प्रकृतीची आहेत, असा अभिप्राय दिला आहे. येथून पुढे क्रमाने नाटकाचे वातावरण, त्याची रचना, त्यातील नैतिक कल्पना, त्यांतील संगीत, त्यांतील रसपरिपोष, त्यातील विनोद, त्यांचे परीक्षण गाडगीळांनी अगदी विश्लेषणात्मक पद्धतीने केले आहे.
 'सराई' या कादंबरीची समीक्षा त्यांनी अशीच केली आहे. ही कादंबरी स्वप्नरंजनात्मक आहे असे त्यांचे मत आहे. म्हणून प्रथम स्वप्नरंजनात्मक साहित्याचे त्यांनी विवेचन केले आहे. मग कथानक, त्यातील वास्तवता व स्वप्नमयता यांचे मिश्रण करण्यातील लेखकाचे कसब, यांचे वर्णन करून कादंबरीतील निसर्गवर्णनांकडे ते वळले आहेत. या निसर्गाचा कादंबरीतील घटनांशी अगदी एकजीव झाला आहे, असे गाडगीळांचे मत आहे आणि कादंबरी वाचताना वाचकाला त्याचा पदोपदी प्रत्यय येत असतो. कादंबरी वाचताना, तिचा आस्वाद घेताना, हा निसर्ग व त्याच्या अंकावर खेळणारी माणसे यांना वाचक अलग करू शकणार नाही. पण समीक्षण करताना समीक्षकाने मात्र त्यांचा पृथकपणेच विचार केला आहे. निसर्गाच्या विविध रूपांचा एक चित्रपटच आपल्या डोळयांपुढून कसा सरकतो ते सांगून मग त्यांतील माणसे (बाप्पाजी, केसूतात्या, लाडी, सयाजी- पात्रे) यांचे व्यक्तिदर्शन कसे झाले आहे ते गाडगीळ सांगतात. दोन्ही एकजीव असूनही सचेतन व अचेतन यांचे अतूट नाते आहे, हे पाहूनही त्याचे परीक्षण ते एकसमयावच्छेदेकरून करीत नाहीत. कथानक, निसर्ग, पात्रे यांचा विचार झाल्यावर गाडगीळांनी वातावरणाचा स्वतंत्रपणे विचार केला आहे.
 ही कादंबरी स्वप्नरंजनात्मक आहे हे वाचकांना परोपरीने गाडगीळ पटवून देत आहेत. पण तसे करताना त्यातील घटकांचा अवयवशःच विचार त्यांनी केला आहे. कादंबरी ही एक एकसंध कलाकृती आहे हे अवधान गाडगीळांनी केव्हाही सुटू दिलेले नाही. रसिकांच्या मनावर तोच परिणाम