पान:सौंदर्यरस.pdf/३०

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
सौंदर्याचे विश्लेषण
२५
 

 मर्ढेकर हे मराठीतले आधुनिक काळातले प्रमुख सौंदर्यशास्त्रज्ञ मानले जातात. सध्याचे बरेचसे समीक्षक हे त्यांचे शिष्य आहेत. त्यांनी याच तऱ्हेचे विचार आपल्या 'ललित वाङ्मयकृतीचा घाट' या लेखात मांडले आहेत. ललितकृती ही एकसमयावच्छेदेकरून आपणास प्रतीत होत असते. तिचे परीक्षण, कथानक, भाषाशैली, कल्पनासौंदर्य असे घटक पृथक्करणाने करणे योग्य नाही. एखाद्या चित्राचे परीक्षण करताना ते एकदम न पाहता त्याच्या एका बाजूने सरकत सरकत दुसऱ्या बाजूपर्यंत जाण्यासारखीच ती साहित्य- समीक्षा होते. मर्ढेकर म्हणतात की, पूर्वीच्या परंपरेत समीक्षणशास्त्राची सारी मदार कथानक, स्वभावलेखन यांच्या विश्लेषणावरच असे. पण त्यांच्या मते हे खरे समीक्षण नव्हे. कलाकृतीचा आपल्याला एकदम साक्षात्कार होत असतो तिची एकसंध अशी जाणीव आपल्याला होत असते. समीक्षणातही हे अवधान आपण ठेविले पाहिजे.
 साहित्यकृतीचे परीक्षण अवयवशः करणे योग्य नाही, तिचे समग्र स्वरूप एकदम पाहिले पाहिजे, या नवटीकेने मांडलेल्या मताचा आता विचार करावयाचा आहे. काही तार्किक पद्धतीने तो विचार करण्यापूर्वी, सध्याचे जे प्रथितयश टीकाकार आहेत त्यांनी ललितकृतींची जी परीक्षणे केली आहेत ती तपासून पाहून नव्या जबाबदार टीकाकारांच्या समीक्षणाविषयी प्रा. कुलकर्णी यांनी जी ग्वाही दिली आहे ती कितपत सत्य आहे याचा पडताळा बघू.
 'साहित्याचे मानदंड' ही प्रा. गंगाधर गाडगीळ यांची लेखमाला प्रसिद्ध आहे. अनेक श्रेष्ठ ललितकृतींची त्या मालेत त्यांनी परीक्षणे केली आहेत. त्यांतील अण्णासाहेब किर्लोस्कर यांचे 'सौभद्र' हे नाटक व र. वा. दिघे यांची 'सराई' ही कादंबरी या दोन मानदंडांचे परीक्षण उदाहरणार्थ आपण घेऊ. ही परीक्षणे वाचताना असे दिसते की, नव्या जबाबदार टीकाकाराने जे करू नये तेच गाडगीळांनी केले आहे. त्यांनी या कृतीचे अवयवशः परीक्षण केले आहे. 'सौभद्र'च्या कथानकाचे प्रथम ते परीक्षण करतात. मूळ महाभारतातील कथानकाशी त्याची तुलना करतात व त्या तुलनेने पाहता सौभद्र हे एक भाबडे नाटक आहे, असे मत देतात. मूळच्या भव्य घटनेला