पान:सौंदर्यरस.pdf/२९

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
२४
सौंदर्यरस
 

तिचे अवयवशः परीक्षण न करणे,' नव्या टीकेचे एक प्रमुख लक्षण म्हणून त्यांनी सांगितले आहे. प्रथम त्यांनी प्रा. वा. म. जोशी, श्री. कृ. कोल्हटकर यांच्या, त्यांच्या मते जुन्या झालेल्या, टीकेचे स्वरूप सांगितले आहे. हे जुने टीकाकार प्रथम कादंबरीचे कथानक सांगतात. मग त्याच्या संभाव्य- असंभाव्यतेची चर्चा करतात, मग ते स्वभावपरिपोषाची पाहणी करतात. नंतर त्या कादंबरीचा विषय समाजहिताच्या दृष्टीने कितपत उपयुक्त आहे, याची चिकित्सा करतात. असे परीक्षण करताना 'असे असले तरी या कादंबरीची भाषा चांगली आहे', 'या नाटकाची भाषा वाईट आहे', असल्या पुस्त्याही ते जोडतात व 'या कादंबरीतील निसर्गवर्णने मोठी बहारदार उतरली आहेत' असेही मोठ्या अगत्याने ते नमूद करतात. प्रा. कुलकर्णी यांचा भावार्थ असा की, हे जुने टीकाकार ललितकृतीचे असे अवयवशः परीक्षण करतात, पण हल्लीचा नवा जबाबदार टीकाकार असे करणार नाही. प्रत्येक वाङ्मयप्रकार हा एकसंध आहे, त्यात आशय आणि अभिव्यक्ती यांची एक प्रकारे अभिन्नता आहे व त्याचे परीक्षण करताना त्याचे हे एकसंघत्व दृष्टीआड करून भागणार नाही. एवढेच नव्हे तर ते दृष्टीआड केल्यास आपले तत्संबंधीचे मूल्यमापन सपशेल चुकीचे ठरण्याचा संभव आहे, हे अलीकडील परीक्षणकारांच्या विशेषत्वाने लक्षात येऊ लागले आहे, असे प्रा. कुलकर्णी यांना वाटते. आणि हे मत मांडतानाच त्यांनी फुलाचा दृष्टान्त दिला आहे. फुलाचा रंग, सुवास, आकार, पाकळ्या यांची मोजदाद करून आपणास त्या फुलाची कल्पना येणार नाही. याचे सौंदर्य लक्षात घेताना आपण त्याचा अवयवशः विचार करून भागणार नाही. त्याच्या समग्र रूपाचा विचार केला पाहिजे. त्याचप्रमाणे ललितवाङ्मयाचे आहे भाषा, निसर्गवर्णने ही कादंबरीशी एकजीव झालेली असतात. ती ठिगळवजा नसतात. ह्याची जाणीव जशी परीक्षणकारांना अधिकाधिक होऊ लागली तसातसा त्यांचा स्वतंत्र उल्लेख आपल्या परीक्षणात करण्याची आवश्यकता नाही, हे त्यांना पटू लागले. वेगळया उल्लेखाने, झाला तर त्या वाङ्मयप्रकाराच्या घडणीबद्दल गैरसमजच होण्याचा संभव आहे (व तसा गैरसमज कित्येक कादंबरीकारांचा झाला, असा आपल्याकडील इतिहास आहे) हे त्यांच्या लक्षात आले व हा उल्लेख करण्याचे ते बहुधा टाळू लागले.