पान:सौंदर्यरस.pdf/२८

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
सौंदर्याचे विश्लेषण
२३
 

त्या वेळी आपण त्या सौंदर्याचे घटक वेगळे करीत नाही हे खरे आहे. पण त्या सौंदर्याची चिकित्सा करताना त्याचे पृथक्करण करणे आवश्यक आहे हे कोणालाही मान्य करावेच लागेल. कण्हेरीच्या फुलाकडे पाहून आपल्याला इतका आनंद होत नाही, गुलाबाकडे पाहून होतो, प्राजक्ताकडे पाहून होतो; याचे कारण शोधताना सृष्टीच्या त्या ललितकृतीचा आपणास अवयवशः विचार करणे प्राप्तच आहे. कण्हेरीच्या फुलाला इतका सुवास नाही, त्याच्या पाकळ्या गलाबाइतक्या नाजुक नाहीत, त्यांची रचना जरा बोजडच असते, गुलाबा इतकी मनोहारी नसते, असे विश्लेषणच आपल्याला करावे लागते. सौंदर्याचा स्वाद घेताना हे करावे लागत नाही, करणे चुकीचे होईल, हे खरे. पण त्याचे परीक्षण करताना घटकांचे पृथक्करण, विश्लेषण अपरिहार्यच असते. साहित्याच्या समीक्षेतही असेच आहे. कादंबरी वाचताना, नाटक पाहताना आपण केवळ आस्वाद घेत असतो. त्या वेळी हे कथानक, हे स्वभावलेखन, ही वर्णनशैली, हे मनोविश्लेषण, ही भाषा, हा शृंगाररस, हा वीररस, हे औचित्य असा विचार आपण करीत नाही. आपल्या मनातही तो येत नाही. त्या ललितकृतीपासून आपल्याला आनंद होत असतो व आपण त्यातच तन्मय झालेले असतो. या आनंदाचे कारण काय, याची चिकित्सा करावी असे आपल्या स्वप्नातही येत नाही. पण ज्या वेळी तसे येते, म्हणजे आस्वादकाची भूमिका सोडून आपण समीक्षकाची भूमिका घेतो, त्या कादंबरीचे वा नाटकाचे टीकाकार म्हणून परीक्षण करू लागतो, त्या वेळी त्याच्या सौंदर्याचे वरील घटक पृथक् करूनच त्यांकडे आपण पाहतो. त्यावाचून गत्यंतरच नसते.

 आस्वादकांनी विश्लेषण करू नये हे जितके सर्वमान्य आहे तितकेच समीक्षकांनी विश्लेषण, पृथक्करण केलेच पाहिजे हेही सर्वमान्य आहे.- निदान आजपर्यंत तरी होते. पण अलीकडे नवसाहित्याबरोबर निर्माण झालेली जी नवटीका तिच्या पुरस्कर्त्यांचे मत निराळे आहे असे दिसते. त्याचाच येथे विचार करावयाचा आहे.

 नवसाहित्याप्रमाणेच नवटीकेचेही प्रा. वा. ल. कुलकर्णी हे एक प्रमुख पुरस्कर्ते आहेत. 'टीका : काल, आज आणि उद्या' या आपल्या लेखात, 'ललितकृतीच्या समग्र रूपाचा एकदम, एकसमयावच्छेदेकरून विचार करणे,