पान:सौंदर्यरस.pdf/२७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे






सौंदर्याचे विश्लेषण



 कादंबरी, नाटक, लघुकथा, काव्य या साहित्यातील ललितकृतींना फुलाची उपमा नेहमी दिली जाते. फुलाच्या सौंदर्याचा आनंद अनुभविताना आपण त्याच्या सौंदर्याच्या घटकांचे विश्लेषण करीत नाही. त्याचा रंग, त्याचा गंध, त्याच्या पाकळ्यांची रचना, त्याची मृदुता, त्याचा ताजेपणा हे सर्व सौंदर्याचे घटक होत, पण आपण फूल पाहतो त्या वेळी या घटकांचा निरनिराळा विचार करीत नाही. सर्व समग्र फूल आपण एकदम पाहतो, एकसमयावच्छेदेकरून पाहतो. आणि म्हणूनच त्याचे सौंदर्य आपल्याला प्रतीत होते. त्या सौंदर्याचे वर सांगिलेले घटक आपण वेगळे करू लागलो तर त्याचे सौंदर्यच लोपेल. आणि आपल्या हाती जड द्रव्यांचा एक पुंज तेवढा उरेल. साहित्यकृतीचे सौंदर्य आस्वादिताना हीच जाणीव ठेवून आपण तिच्या सौंदर्याचे विश्लेषण न करता, सामग्ऱ्याने तिचे दर्शन घेतले पाहिजे, तरच आपल्याला तिचे खरे मर्म कळेल, असे आजवर अनेक टीकाकारांनी सांगितले आहे आणि ते बहुमान्यही झाले आहे.

 पण साहित्य सौंदर्याचा आस्वाद घेणे निराळे आणि त्याचे परीक्षण करणे निराळे. फुलाचेच उदाहरण घेतले तरी हा फरक आपल्या ध्यानात येईल. झाडावरचे एखादे गुलाबाचे फूल आपण पाहतो, किंवा तळ्यातील कमळ पाहतो आणि त्या सौंदर्यदर्शनाने आपल्याला अतिशय आनंद होतो,