पान:सौंदर्यरस.pdf/२६

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
सौंदर्यरस
२१
 

चिंतनामुळे, संशोधनामुळे परिवर्तने होत राहतील, रहावी, हे म्हणणे सयुक्तिक आहे. पण नव्या युगात रसव्यवस्थाच त्याज्य मानावी हे म्हणणे युक्त नाही. कारण मानवी जीवनाशी रस हे श्वासोच्छ्वासाइतकेच निगडित आहेत.
 तेव्हा कलाशास्त्राच्या दृष्टीनें रसचर्चा ही नित्य होणे हे अत्यंत इष्ट आहे. म्हणूनच सौंदर्य हा स्वतंत्र रस मानला पाहिजे असे येथवर आग्रहाने प्रतिपादिले आहे हा रस इतर रसांच्या तुलनेने सर्वव्यापी आहे. तो जिच्या ठायी नाही अशी कलाकृती असणेच शक्य नाही. कारण रचना हा सर्व कलांचा प्राण आहे. आणि रचनेतूनच सौंदर्यरसाची प्रतीती होते. सौंदर्यरसाच्या या सर्वव्यापित्वामुळेच तो स्वतंत्र रस मानण्याची जरूर नाही, असा एक पक्ष मांडण्यात येतो. शृंगार, वीर, करुण, भक्ती इत्यादी रसांची निर्मिती सुरेख रचनेवाचून होणेच शक्य नाही. तेव्हा प्रत्येक रसाच्या मुळाशी सौंदर्यरस गृहीत धरलेलाच आहे. म्हणून त्याची निराळी व्यवस्था नको, असे कोणीं म्हणतात. पण हे म्हणणे युक्त नाही. एक तर प्रत्येक कलाकृतीत दुसरा कोठला तरी रस असतोच असे नाही. दक्षिण हिंदुस्थानातील मीनाक्षी, श्रीरंग यांची मंदिरे, उत्तरेतील ताजमहाल, कोणार्क, सांची यांसारखे स्तूप, इजिप्तमधील पिरॅमिड, यूरोपातील चर्चेस यांमध्ये केवळ सौंदर्य हाच रस आहे. फुले, इंद्रधनू, नक्षत्रे इत्यादी निसर्गकलाकृतीत त्यावाचून अन्य रस नाही. पुष्कळ वेळा संगीत व नृत्य यांना विशिष्ट विषय नसतो. केवळ रागदारी आणि केवळ पदन्यास व अंगविक्षेप असेच त्यांचे रूप असते. अशा वेळी त्यात सौंदर्य हाच एकमेव रस असतो. पण ते कसेही असले तरी सुसंगतीविषयीची मानवी मनातली जी उत्कट इच्छा, तिचा जो आविष्कार अखंड होत असतो त्याला स्वतंत्र स्थान न देणे हे अशास्त्रीय ठरेल विसंगतीतून निर्माण होणाऱ्या हास्यरसाला 'रस' पदवी दिल्यानंतर तिच्यापेक्षा शतपटीने मानवी जीवनाला व्यापून राहिलेल्या सुसंगतीच्या प्रेमाची दखल शास्त्रज्ञांनी घेतलीच पाहिजे. मागे सांगितल्याप्रमाणे सुसंगती हा सर्व मानवी संस्कृतीचा पाया आहे. तिला 'रस' पदवी दिल्याने मानवी जीवन निश्चितपणे जास्त समृद्ध होईल.