पान:सौंदर्यरस.pdf/२५

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
२०
सौंदर्यरस
 

तेव्हा त्या घटकांपासून होणारा जो आनंद त्याहून या सुसंवादापासून मिळणारा आनंद अगदी वेगळा आहे. त्यालाच सौंदर्यानंद असे मी म्हणतो. आणि तो. देणारा तो सौंदर्य रस.
 एखाद्या रसाचे स्वरूप निश्चित करावयाचे म्हणजे स्थायीभाव, विभाव, अनुभाव, उद्दीपनविभाव या शास्त्रीय परिभाषेत त्याची मांडणी करणे अवश्य आहे, असे साहित्यशास्त्रज्ञ सांगतात. त्यांचा हा आग्रह मला सयुक्तिक वाटतो. म्हणून सौंदर्यरसाची तशी मांडणी करून हे विवेचन संपवितो.
 समागमाची उत्कट इच्छा हा शृंगाराचा, समर्थाला शरण जावे हा भक्तीचा, बालकाला आश्रय द्यावा ही उत्कट इच्छा हा वत्सलरसाचा, त्याचप्रमाणे रचना, नवनिर्मिती करावी, सुसंगती पहावी ही उत्कट इच्छा हा सौंदर्य रसाचा स्थायीभाव होय. वेरूळ, अजंठा, खजुराहो येथील शिल्प; रविवर्मा, रवींद्रनाथ यांची चित्रे; शिवछत्रपती, महात्माजी यांचे पुतळे; तानसेन, केसरबाई यांचे गायन; कालीदास, शेक्सपीयर यांची नाटके; 'रामायण', 'महाभारत', 'रघुवंश' ही काव्ये, गोपीकृष्ण, मेनका, रजनी यांचे नृत्य, हे सर्व या रसाचे आलंबनविभाव होत. या कलाकृती पहाताना डोळे विस्फारणे, धन्यतेचे उद्गार काढणे, अवाक् होणे हे अनुभाव आणि या कलाकृतींची, त्यातील कौशल्याची, त्यातील सौंदर्याची वर्णने हे उद्दीपन- विभाव होत. अशा तऱ्हेने जुन्या शास्त्रीय अवस्थेच्या दृष्टीने पाहिले तरी सौंदर्याचे रसस्वरूप सिद्ध होते.
 रसव्यवस्था आता जुनी झाली, तिचे कुंपण नव्या साहित्यातील नव्या प्रवृत्तींना घालू नये, असा एक आक्षेप मागे क्रान्तिरसासंबंधी चर्चा झाली तेव्हा उद्भावित करण्यात आला होता. भरताने आखून दिलेल्या व्यवस्थेत आंधळेपणाने सर्व साहित्य बसवू नये, रसव्यवस्थेला कर्मकांडाचे रूप देऊ नये. एवढ्याच अर्थाने हे म्हणणे सयुक्तिक ठरेल. पण रसव्यवस्थाच जुनी झाली, तेव्हा ती त्याज्य मानावी, हे म्हणणे श्वासोच्छ्वासव्यवस्था जुनी झाली म्हणून ती टाकून द्यावी, या म्हणण्यासारखे आहे. शृंगार, वीर, करुण, भक्ती, सौंदर्य या मानवी मनातल्या शाश्वत भावना आहेत. त्यांचा आविष्कार कलाकृतीत जगाच्या प्रारंभापासून होत आला आहे आणि जगाच्या अंतापर्यंत तो होत राहील. त्याची व्यवस्था म्हणजे रसव्यवस्था. या व्यवस्थेत नव्या नव्या