पान:सौंदर्यरस.pdf/२४

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
सौंदर्यरस
१९
 

कळते की नाही, अशी शंका प्रकट करून स्वस्थ बसावे हे बरे. तोच म्हणतो की, ही सौंदर्याभिरुची दुर्मिळ- अत्यंत दुर्मिळ आहे. उलट संगीताची अभिरुची लक्षावधी लोकांना असते, हे प्रत्यक्षात आपण पहातो. तेव्हा लाखात एखाद्यालाच लाभलेल्या अभिरुचीचा व तिचा विषय जो सौंदर्यभावना त्याचा विचार शास्त्रात कसा करता येईल ?

 सौंदर्य हा शृंगार- वीर- करुण- वत्सल- भक्ती यांसारखा एक स्वतंत्र रस आहे, असा सिद्धान्त मला मांडायचा आहे, असे आरंभी मी सांगितले आहे. त्याची ही पूर्वतयारी झाली. आता त्या सिद्धान्ताची मांडणी करून हे विवेचन संपवितो. रचना करावी, सुसंगती निर्माण करावी, सुरेखाकार पहावा, ही मानवाची उपजत प्रवृत्ती या रसाच्या बुडाशी आहे. आरंभीच्या अवस्थेत त्याने केलेल्या धनुष्यबाण, झोपडी, जाळे, शेतीची आयुधे या सर्व रचना बोजड व बव्हंशी स्वसंरक्षण व वंशसातत्य यांसाठीच उपयुक्त अशा होत्या. त्याही अवस्थेत काही रेखाकार, काही स्वररचना, काही पदन्यास उपयुक्ततेच्या पलिकडच्या कक्षेत जातील असे तो करीत असे. पण कला म्हणण्याजोगे सौंदर्य त्यांत नव्हते. त्या रचना होत्या, पण त्या प्राथमिक अवस्थेत होत्या. पुढे त्याची प्रज्ञा विकसत चालली, निसर्गावर त्याचे प्रभुत्व प्रस्थापित झाले, तसतशा त्यांच्या रचना जास्त सूक्ष्म तरल होऊन प्रमाणबद्धता, लय, तोल, अंगांगीभावात्मक एकात्मता, यथार्थ दर्शन, भावनाभिव्यंजन व आत्माविष्कार या गुणांनी संपन्न होऊन त्यांना कलास्वरूप येऊ लागले. चित्र, शिल्प, वास्तू, नृत्य, संगीत, काव्य, नाट्य-- या सर्व कला अशाच मार्गांनी विकसत जाऊन त्यांना मनोहर रूप प्राप्त झाले. त्या कलाकृती पहाताना त्यातल्या सुसंगतीच्या, उचित संन्निवेशाच्या दर्शनाने मनुष्याच्या चित्तात जी भावना निर्माण होऊ लागली तीच सौंदर्यभावना तीच हळूहळ उत्कट होऊन पूर्ण आस्वाद्यमान होते व 'रस'पदवी पावते. या कलाकृतीत स्वभाव- लेखन, निवेदनशैली, निसर्गचित्रे इत्यादी जे गुण असतात ते सौंदर्याला कारणीभूत होतातच. पण या सर्वांचा सुसंवाद नसेल, त्यांत अंगांगीभावात्मक एकात्मता नसेल, सुश्लिष्ट संधिबंध नसेल तर तो आनंद उत्कट होणार नाही. इतकेच नव्हे, तर सुसंगतीच्या अभावी सर्व आनंदावर कधी विरजणही पडेल.