पान:सौंदर्यरस.pdf/२३

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
१८
सौंदर्यरस
 

केव्हा मानावयाचे? कोणत्याही रेघोट्या किंवा कोणतेही एकत्र फासलेले चार रंग म्हणजे कला नव्हे. मग रेषा व रंग यांना 'कला' पदवी केव्हा येते? सिग्निफिकंट फॉर्मचा अर्थ काय? क्लाइव्ह बेलने अन्योन्याश्रय करून याचे उत्तर दिले आहे. याचाच अर्थ असा की, त्याच्याजवळ उत्तर नाही. ज्या रंगरेषा संगतीमुळे सौंदर्यभावना जागृत होते त्या संगतीला 'सिग्निफिकंट फॉर्म' म्हणावयाचे. आणि सौंदर्यभावना म्हणजे काय ? तर 'सिग्निफिकंट फॉर्म' मुळे जी जागृत होईल ती भावना ही सौंदर्यभावना ! तेव्हा क्लाइव्ह बेल याची सौंदर्यभावना हे एक गूढ आहे, बुद्धीच्या अतीत असे काही आहे, अनाकलनीय आहे, असे म्हणून तिचा नाद सोडून दिला पाहिजे.
 संगीतातून सौंदर्य निर्माण होते. ते सौंदर्य केवळ स्वररचनेचे आहे. असे काही रसिकांचे मत आहे. शृंगार-करुणादी भावना संगीताने जागृत होतात हे खरे; पण त्यांच्या मते संगीताचे सौंदर्य निश्चित करण्याचा तो निकष नाही. हे रसज्ञ रसभावाचे महत्त्व मानीत नसले तरी स्वररचनेचे सौंदर्य काय ते ते निश्चितपणे, स्वतंत्रपणे, अन्योन्याश्रय न करता सांगतात. प्राध्यापक अरविंद मंगरूळकर यांनी केसरबाईच्या गायनाचे केलेले वर्णन या दृष्टीने पहाण्याजोगे आहे. 'त्यांच्या गायनात आलाप, तान, बोलतान अशा सर्व ठिकाणी कळसाच्या जागा विखुरलेल्या असतात. तानेच्या व बोलतानेच्या अंती त्यांच्या समेच्या जागा रेखीवपणे येतात. दर आवर्तनाला केसरबाई स्वररचना तरी किंवा लयप्रकार तरी पालटीत असतात. 'परज' राग म्हणताना 'बसंत', 'सोहनी' व 'कलंगडा' या तीन रागांपासून त्याला त्यांनी कौशल्याने संभाळीत नेले.'- या वर्णनात रचनेचे स्वतंत्र निकष प्रा. मंगरूळकरांनी लावले आहेत असे स्पष्ट दिसते. आणि सर्वात मोठा निकष म्हणजे प्रत्येक रागाची स्वररचना काय ते निश्चित ठरलेले आहे, हा होय. या निकषाप्रमाणे गाणे झाले की, त्यामुळे ब्रह्मस्वादसहोदर असा आनंद प्राप्त होतो, असे ते म्हणतात. उत्तम गायन कोणते, तर ब्रह्मानंद देईल ते; व ब्रह्मानंद कोणता, तर उत्तम गाण्यापासून होईल तो, असा परस्परावलंब त्यांनी केलेला नाही. तो क्लाइव्ह बेल याने केला आहे. तेव्हा त्याची सौंदर्यभावना त्याची त्यालाच कळते असे म्हणून किंवा त्याला तरी