पान:सौंदर्यरस.pdf/२२

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
सौंदर्यरस
१७
 

तून तो सिद्ध झाला की रचना सार्थ झाली. त्या व्यक्तीची रूपे अनुरूप असली पाहिजेत, हालचाली अनुरूप असल्या पाहिजेत व त्या त्या प्रसंगीच्या शृंगार, भीती, वीर, इत्यादी भावना नृत्यातून प्रकट झाल्या पाहिजेत. यालाच मी रचना म्हणतो. सार्थ हा शब्द वापरण्याची जरूरच मला वाटत नाही. कारण रचना या शब्दात तो भावार्थ आहेच. नाही तर रचना म्हणजे केवळ एक ढीग किंवा समूह, किंवा रेघोट्या असे होईल. त्यांना 'रचना' शब्द लावणे चूकच आहे. पण क्लाइव्ह बेलने 'सिग्निफिकंट फॉर्म' असा शब्द वापरला आहे. म्हणून त्याच्याविषयी विवेचन करताना 'सार्थ रचना' असा शब्दप्रयोग मी केला आहे.
 पण क्लाइव्ह बेल याला माझा विवक्षित अर्थ मुळीच मंजूर नाही. यथार्थ दर्शनाला त्याच्या मते महत्त्व नाही. चित्रात टिळक हे टिळकांसारखेच दिसले पाहिजेत असा त्याचा आग्रह नाही. चित्र, शिल्प यातून शृंगार, वीर, करुण, इत्यादी भावना व्यक्त व्हाव्या ही अपेक्षा त्याच्या मते अभिरुचीच्या उणिवेची द्योतक आहे. सर्व कौशल्य रेषा व रंग यांवर लक्ष केंद्रित करण्यावर आहे. त्या आणि फक्त त्याच पाहून जी भावना जागृत होते ती सौंदर्यभावना ! ज्या चित्रकाराला रेषा व रंग यांतून अशी भावना जागृत करता येत नाही तो शृंगार- वीर- करुण- वत्सल इत्यादी नित्याच्या भावना जागृत करतो. एखादे फाशीचे चित्र काढताना भीती, दया या भावना हलक्या दर्जाचा चित्रकार जागृत करील. व गौण अभिरुचीच्या लोकांनाच त्यात आनंद वाटेल. या नित्याच्या भावना अनुभवण्यासाठी कलेचा उपयोग करणे म्हणजे दुर्बिणीचा उपयोग वर्तमानपत्रे वाचण्यासाठी करण्यासारखे आहे. ज्यांना सौंदर्यभावनेची अभिरुची नाही, ते लोक चित्राचा आठव त्याच्या विषयावरून करतात. ज्यांना तो आहे त्यांना चित्राचा विषय काय आहे याची कल्पनाही नसते. मग ते काय पहातात? रेषा व रंग ! नित्याच्या जीवनातला कोणताही भाव, कोणताही रस, कोणताही अर्थ कलाकृतींतून प्रकट करणे हे कलेच्या हीनतेचे व हीन अभिरुचीचे द्योतक आहे, असे बेल म्हणतो.
 यावर प्रश्न असा येतो की, रेषा व रंग यांकडे पहाताना कोणत्या अपेक्षेने पहावयाचे? त्यातून 'सिग्निफिकंट फॉर्म' निर्माण झाला, असे

 सौ. २