पान:सौंदर्यरस.pdf/२१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१६
सौंदर्यरस
 

रचना सार्थ असते, साभिप्राय असते, तिचे अंतिम उद्दिष्ट प्रथमपासूनच ठरलेले असते, असेही तेथे सांगितले आहे. 'साभिप्राय रचना, सार्थ आकृतिबंध' असा शब्द क्लाइव्ह बेल या विख्यात कलाकोविदानेही वापरला आहे. 'आर्ट' या आपल्या पुस्तकात 'सिग्निफिकंट फॉर्म'- सार्थ बंध, हे सर्वं दृश्य कलांचे लक्षण, तोच त्यांचा समानधर्म, असे त्याने पहिल्याच प्रकरणात म्हटले आहे. पण सार्थ बंध, सार्थ रेखा या शब्दाची त्याची विवक्षा, या शब्दाचा त्याच्या मनातील अर्थ अगदी वेगळा आहे. म्हणून त्याचे स्पष्टीकरण करणे अवश्य वाटते. पहिली गोष्ट म्हणजे क्लाइव्ह बेल फक्त दृश्य कलांचा- व्हिजुअल आर्टस् चा- विचार करतो. चित्र, शिल्प, वास्तू, नक्षी असलेली पात्रे, विणकाम या त्याच्या मते दृश्य कला आहेत. संस्कृत साहित्यशास्त्र नाटक हे दृश्यकाव्य, अर्थातच दृश्य कला आहे, असे मानते. पण क्लाइव्ह बेल याला ते मान्य नाही असे दिसते. नृत्य आणि संगीत या विशुद्ध कला आहेत असे त्याने एके ठिकाणी म्हटले आहे, पण मूळ विवेचन करताना त्यांचा तो अंतर्भाव करीत नाही. चित्र, शिल्प इत्यादी वर निर्देशिलेल्या कलांचाच फक्त तो विचार करतो.

 पण सार्थ बंध, साभिप्राय रेखाकार हे लक्षण सांगताना मी जी विवक्षा मानली आहे तीहून त्याची विवक्षा निराळी आहे. माझ्या मते टिळकांचे चित्र किंवा त्यांचा पुतळा या रचना, हे रेखाकार सार्थ केव्हा ठरतील? टिळकांचे चारित्र्य, त्यांचे धैर्य, त्यांची अतुल प्रज्ञा, त्यांची राष्ट्रभक्ती या सर्वांची प्रतीती चित्रात येईल तेव्हा. शिवाय टिळकांच्या रूपाचे यथार्थ दर्शन त्या चित्रात किंवा पुतळयात झाले पाहिजे. वेरूळ- अजंठ्याच्या शिल्पात शिवपार्वती- विवाह, रावणवध या कथा मूर्त केल्या आहेत. तेव्हा त्या शिल्पात विवाहसमयीच्या भावना, वधसमयीच्या भावना, त्या वेळची पार्श्वभूमी, त्यातील व्यक्तींचे उभे रहाणे, बसणे हे सर्व दृष्टिगोचर झाले पाहिजे. विवाह किंवा वध व्यक्त करणे हा अभिप्राय कलाकाराच्या चित्तात असतो. तो रेखारंगातून त्याने व्यक्त केला की तो सार्थ बंध झाला. मागे शंकर कुटीच्या नृत्याचे वर्णन दिले आहे. बळी, वामन, भस्मासुर, मोहिनी यांना काही प्रसंगांनी मूर्त करावे असा नर्तकाचा हेतू होता. सर्व हावभावां