पान:सौंदर्यरस.pdf/२०

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
सौंदर्यरस
१५
 

पेशापेक्षा एक विद्या किंबहुना पाचवा वेदच अशा उच्च प्रकारची होती, असा भावार्थ रानडे प्रकट करतात. तर केळकर म्हणतात की, 'अलंकारिक रेषा, अलंकारिक मांडणी शिकवून, चित्ररचनेचे जीवितकार्य जे शोभादायक आकार निर्मिण्याचे ते करण्यास विद्यार्थी समर्थ व्हावा.' 'चित्रात रसभावांचा उत्कर्ष साधला तरच चित्र नामांकित होऊ शकते.'

 या विवेचनाचा इत्यर्थ असा की, प्राथमिक अवस्थेत पुष्कळ वेळा कलेचा बाह्याकार हा परिणत अवस्थेतल्यासारखा असला, दोन्ही अवस्थांत क्रिया तीच असली, तरी त्या कृतीला कला म्हणता येणार नाही. तिचा साचेबंदपणा कमी होत गेला, तिच्यातून कलाकाराचा आत्माविष्कार होऊ लागला, रसभाव प्रकट होऊ लागले, मानवाची कल्पनाशक्ती, बुद्धी, प्रज्ञा आणि त्याचा आत्मा या सर्वांना त्या कृतीतून आवाहन होऊ लागले, आणि अखेर तिच्यापासून अनिर्वचनीय, ब्रह्मास्वादसहोदर असा आनंद लाभू लागला, तर त्या कृतीला कलेची प्रतिष्ठा येईल. पायरी पायरीने कलेची अशी परिणती होत असताना तिच्यातील जीवनोपयोगित्वाचा भाग कमी कमी होत जातो, स्वसंरक्षण व वंशसातल्य यांसाठीच त्या मूलभूत प्रवृत्ती निर्माण झाल्या असल्या तरी परिणत अवस्थेत ते हेतु लोपतात, आणि विशुद्ध आनंद हाच एकमेव हेतू त्या अवस्थेत शिल्लक रहातो. वर ज्या डॉक्टर मॅरेट यांचा उल्लेख केला आहे त्यांनी म्हटले आहे की, 'जीवनातली हो विनोदने वा रामणीयके कोणत्याही दृष्टीने उपयुक्ततेच्या सदरात पडत नाहीत. जीवनशास्त्राच्या दृष्टीने सर्वांत महत्त्वाचे असे जे सातत्यमूल्य किंवा मृत्युंजयमूल्य ते त्यांना नाही. किंवा सत्ता, संपत्ती ही व्यावहारिक मूल्येही नाहीत. तरी कुंद हवेच्या दिवशी सूर्यकिरण दिसावा त्याप्रमाणे क्षणभर जरी एखादा आकृतिबंध, एखादी सुरेखा दिसली तरी जीवनातल्या उच्च मूल्यांची प्रतीती येऊन त्याचे भविष्य उजळते. आणि त्यापासून विशुद्ध आनंदाची प्राप्ती होऊन वासनांचे उदात्तीकरण होते व आत्मा संपन्न होतो.'

 सर्व कलांचा आत्मा, त्यांचा समानधर्म, त्यांच्या सौंदर्याचे रहस्य हे रचनेत आहे, सन्निवेशात आहे, असे वर अनेक ठिकाणी म्हटले आहे. ही