पान:सौंदर्यरस.pdf/१९

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
१४
सौंदर्यरस
 

क्रूर, अनार्य, रानटी लोकांशी विनोद कसला करतोस ? त्यांना काय समजणार आहे ?' वीररसाचे असेच आहे. देशात रोज अनेक खून पडत असतात, लोक दरोडे घालीत असतात, त्यात क्रोध, संताप, त्वेष या भावनांचा खेळ चालूच असतो. पण अन्यायाचे परिमार्जन, दीनांचे संरक्षण, राष्ट्रीय अपमानाचा सूड असे उदात्त ध्येय ज्या क्रोधामागे नाही, त्यातून रस पदवीला प्राप्त होईल अशी वीरभावना निर्माण होत नाही. शृंगार, हास्य, वीर यांच्याविषयीचा हा विचार सर्वच रसांच्या बाबतीत खरा आहे. आणि नृत्य, शिल्प, चित्र, संगीत या कलांच्या बाबतीतही तो खरा आहे. बाह्यतः रूप तेच असले तरी तेवढ्यामुळे कोणतीही रचना कला पदवीला पोचेल असे नाही.

 रोहिणी भाटे यांनी 'महाराष्ट्रजीवन' या ग्रंथात नृत्यकलेचे विवेचन करताना असेच मत मांडले आहे. महाराष्ट्रातील भिल्ल, कातकरी, वारली, गोंड, ठाकर इत्यादी आदिवासी जमातींत शेतां अंगणातून रानावनातून नृत्य रुणझुणते. पण कला म्हटल्यावर जी एक रचना, जो जाणीवपूर्वक आत्माविष्कार, पूर्वानुभूत सौंदर्याचा जो नवा आकार आपल्या मनात अभिप्रेत असतो त्या दर्जाची ही कलादृश्ये नसल्याने या पद्धतीच्या नृत्याला कला ही पदवी प्राप्त झालेली नसते. लोकनृत्य किंवा जानपद नृत्य याची पायरी यापुढची आहे. पण याही नृत्यात वैयक्तिक आत्माविष्काराची प्रेरणा दिसून येत नसल्यामुळे त्याला कला म्हणून संबोधणे सार्थ वाटत नाही. आनंदप्रदान, आत्मप्रकटीकरण व नवनिर्मिती हे प्रयोजन स्पष्टपणे दिसल्यावाचून कोणतेही नृत्य कलाप्रतिष्ठा पावणार नाही. संगीत, चित्र या कलांचे रसज्ञ ग ह. रानडे, नी. म. केळकर यांनी आपल्या विवेचनात हाच अभिप्राय व्यक्त केला आहे. संगीत म्हणजे स्वरतालांचा नियमबद्ध, सुरेल मिलाफ व त्याद्वारा भावनाविष्कार होय. संगीत म्हणजे संयम, शिस्त, प्रतिभाविलास आणि आनंद! सामुदायिक खेळ, प्रार्थना, कवायत यांसाठी ही गाणी आहेत. या सर्व संगीतास ताल व स्वर यांचे अधिष्ठान असतेच. सर्व संगीतास तेच पायाभूत असते. या लोकसंगीताहून शास्त्रीय संगीत वेगळे आहे असे नव्हे, तर तो त्याचा परिपाक व परमोत्कर्ष होय. आणि उच्च पातळीवर चालणारे संगीत तेच शास्त्रीय संगीत होय. संगीताकडे पाहण्याची महाराष्ट्रीय कलावंतांची दृष्टी