पान:सौंदर्यरस.pdf/१८

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
सौंदर्यरस
१३
 

तेव्हाच त्यांना वाङ्मयात स्थान मिळाले व 'रस' पदवी प्राप्त झाली. तेव्हा या भावनांच्या बुडांशी असलेल्या सहजप्रवृत्ती जितक्या सार्वत्रिक होत्या व आहेत तितकीच सौंदर्य भावनेच्या बुडाशी असलेली रचनाप्रवृत्ती सार्वत्रिक होती व आहे.

 डॉ. वाटवे यांनी कामवासना अतिशय उन्नत अवस्थेला गेली म्हणजे मगच तिला शृंगाररस असे म्हणतात, हा विचार आपल्या 'रसविमर्श' या ग्रंथात सविस्तर मांडला आहे. ते म्हणतात, 'शृंगाराच्या प्राथमिक अवस्थेत केवळ शारीरिक क्रियेलाच महत्त्व असते. या अवस्थेत विचारशून्यता असते व मानसिकता कमी असते. ही प्राथमिक अवस्था शृंगाररसाला अनुकूल नाही. कामभावना परिणत झाली म्हणजे तिच्यामध्ये कोमल भावनेचा प्रादुर्भाव होतो. सुसंस्कृत माणसांत तर कामभावना अत्यंत संमिश्र स्वरूपाची व गुंतागुंतीची होते. ही भावना संमिश्र असून त्यामुळेच ती सर्व भावनांत अतिशय प्रबळ असते, असे स्पेन्सरने म्हटले आहे. या कोमल भावनेतच आत्मस्वातंत्र्य, स्वयंनिर्णय व सौंदर्यभावना इत्यादी अनेक भावनांची भर पडून तिचे मूळचे सहजप्रवृत्तीचे रूप कमी कमी होत जाऊन ती उन्नत होते. सुसंस्कृत समाजात माणूस वाटेल त्या स्त्रीचा स्वीकार न करता तिची निवड करतो. हीच प्रवृत्ती पुढे वाढत जाऊन स्त्रीच्या ठिकाणी सौंदर्याचा किंवा ध्येयभूत गोष्टींचा साक्षात्कार आपणास व्हावा, अशी भावना पुरुषहृदयात उदित होते हॅवेलाक एलिसच्या मते मानवी जीवनास कामप्रवृत्तीमुळेच सौंदर्य व उदात्तता प्राप्त होते. एतावता, शृंगारभावना ही क्रीडाप्रवृत्तीची, सौंदर्याची व सदभिरुचीची पराकाष्ठा आहे.' ('रस विमर्श '- पृ. ३०९, १०.) हास्यरसाचे असेच आहे. वन्य जमातीतही हास्यविनोद आहे. पण अत्यंत सामान्य व ढोबळ विसंगतीच त्यांना जाणवते. श्रेष्ठ विनोदाचे आकलन करण्याची पात्रता त्यांना नसते. श्रीरामचंद्रांनी शूर्पणखेला लक्ष्मणाकडे पाठविले व तिचे नाक, कान कापून टाक असे त्याला सांगितले. पण, 'मी धाकटा भाऊ आहे, राम मोठा आहे, तू त्याचीच बायको शोभशील, त्याला एक बायको आहे, पण तो दुसरी करील.' अशी लक्ष्मण तिची चेष्टा करू लागला. तेव्हा श्रीरामचंद्र म्हणाले, 'क्रूरैरनार्यैः सौमित्र परिहासः कथंचन ।' 'लक्ष्मणा,