पान:सौंदर्यरस.pdf/१७

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
१२
सौंदर्यरस
 

 मर्ढेकरांचा हा युक्तिवाद त्यांच्या इतर- साहित्यविषयक सिद्धान्तातील युक्तिवादाप्रमाणेच भ्रांत व प्रामादिक आहे. सौंदर्याभिरुची ही फार अल्पसंख्याकांच्या ठायीच असते, हे मत आज वन्य जातींचा कोणीही अभ्यासक मान्य करणार नाही. वर डॉ मॅरेट यांचे मत दिलेच आहे. पण अत्यंत प्राचीन काळच्या जमातीचे जे अवशेष आज उत्खननात सापडतात त्यांत दिसून येणारी जी चित्र, नृत्य, संगीत इत्यादी कलांची प्रमाणे, त्यावरून याविषयी शंका रहातच नाही. त्या कला त्या काळी अगदी प्राथमिक अवस्थेत होत्या हे खरे. आणि त्यामुळे त्या जमातींची सौंदर्य भावनाही फार ढोबळ, अविकसित स्वरूपाची होती हेही खरे, पण शृंगार, वात्सल्य, भक्ती, अशा सर्वच भावना त्या काळी प्राथमिक बोजड अवस्थेत होत्या. त्या अवस्थेत त्यांना भावना म्हणण्यासही पुष्कळ अभ्यासक तयार नसतात. त्या केवळ वासना होत्या. पण रानटी जमातीतही केव्हा केव्हा त्यांना थोडे वरचे रूप प्राप्त होत असे. तोच प्रकार सौंदर्यभावनेचा आहे. दुसरे असे की, सौंदर्यभावनेच्या मुळाशी असलेली जी रचनाप्रवृत्ती ती मानवाच्या सहजप्रवृत्तीपैकीच एक असून, स्वसंरक्षण व वंशवर्धन यांशी तिचाही घनिष्ठ संबंध आहे हे आरंभी दाखविले आहे. घर, कातडी, धनुष्यबाण, फरशी, दगडी भांडी, पाण्यात तरणारा ओंडका अशी काही रचना केल्यावाचून मानव जगूच शकला नसता. पक्षी घरटी बांधतात, कोळी जाळी विणतो, मुंग्या वारुळामध्ये थोडी गृहरचना करतात. यावरून पशुपक्ष्यांतही, कृमिकीटकांतही रचनाप्रवृत्ती असते असे दिसून येते. मग मानवप्राण्यात ती प्रारंभीच्या काळी असेल यात नवल काय ? या प्रवृत्तीतून मानवाने प्रारंभी प्रारंभी निर्माण केलेल्या कृती जीवनाला, वंशसातत्याला अत्यंत उपयुक्त अशाच होत्या. पुढे पुढे त्यातील उपयुक्ततेचा अंश जसाजसा कमी होत गेला, केवळ आनंद, मनोविनोदन एवढेच त्यांचे कार्य राहिले, तेव्हा त्या कृतींना कलेची पदवी प्राप्त झाली आणि त्या कृती पाहून जी भावना जागृत होऊ लागली तिला सौंदर्य भावना असे अभिधान प्राप्त झाले. पण हे सर्वच भावनांचे आहे. शृंगार, वीर, करुण, वत्सल, भक्ती या भावना आरंभी केवळ जीवशास्त्रीय दृष्ट्या महत्त्वाच्या होत्या. त्यांना उन्नत रूप मिळत गेले, उपयुक्ततेचा त्यांशी असलेला प्रत्यक्ष संबंध दुरावत चालला,