पान:सौंदर्यरस.pdf/१६

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
सौंदर्यरस
११
 

आहे, हे मागे सांगितलेच आहे. अर्थात ती मानवजातीच्या प्रारंभापासूनच मानवाच्या ठायी असणे हे ओघतःच येते. आज वन्य जमातींच्या संबंधी बरेच संशोधन चालू आहे. त्यातून असे दिसून आले आहे की, मानव गुहेत रहाण्याइतका वन्य अवस्थेत होता तेव्हाही दगडावर रेघोट्या मारून किंवा कोरणी करून काही चित्रे काढावी ही हौस त्याला होती. त्याचप्रमाणे त्या रानटी अवस्थेतही फेर धरून नृत्य करावे, काही तालबद्ध हालचाली कराव्या आणि तोंडाने काही गाणी म्हणत त्याच्या ठेक्यावर पावले टाकावी ही पण अभिरुची त्याला होती. तेव्हा कलेची- म्हणजेच सुबद्ध रचनेची- अभिरुची प्रारंभापासूनच मानवाला आहे हे निर्विवाद होय. एल्. ॲडम यांच्या 'प्रिमिटिव्ह आर्ट' या पुस्तकाला जोडलेल्या प्रस्तावनेत प्रस्तावनाकार डॉ. आर. आर. मॅरेट म्हणतात, 'कला ही मानवी जीवनाशी अखंड संबद्ध आहे. प्रारंभीच्या वन्य अवस्थेत ती नव्हती आणि पुढे केव्हा तरी निर्माण झाली, असे म्हणता येणार नाही. त्या काळी त्या कलेचे स्वरूप अगदी प्राथमिक असेल, ती अविकसित अवस्थेत असेल, पण तिची रुची म्हणजेच सौंदर्याभिरुची त्या काळीही बहुसंख्यांना होती हे निश्चित.'

 पण सौंदर्यभावना ही राग, द्वेष, भीती, प्रेम या भावनांहून अगदी निराळी, स्वतंत्र भावना आहे, हे सिद्ध करण्यासाठी मर्ढेकर असा मुद्दा पुढे मांडतात की, स्वसंरक्षण व वंशवर्धन यांशी रागद्वेषादी भावनांचा घनिष्ठ संबंध आहे, तसा सौंदर्यभावनेचा नाही. आणि त्यामुळे निसर्गाने त्या भावना जशा अखिल मानवजातीला दिल्या आहेत, तशी सौंदर्यभावना दिलेली नाहीं. ती अगदी अल्पसंख्याकांच्या ठायी दिसते. जीवशास्त्रीय दृष्ट्या रागद्वेषादी भावनांप्रमाणे ती महत्त्वाची असती, तर निसर्गाने तिचे वरदान सर्वांना दिले असते. पण तसे ते दिलेले नाही. भीती, प्रेम या भावना नष्ट झाल्या तर मानववंश टिकूच शकणार नाही. पण सौंदर्यभावना नष्ट झाली तर स्वसंरक्षण व वंशवर्धन यांत मुळीच अडचण येणार नाही. हा भेद स्पष्ट असण्यामुळे सौंदर्यभावना ही रागद्वेषादी भावनांहून अगदी निराळी आहे, असे निश्चित म्हणता येते.