पान:सौंदर्यरस.pdf/१५

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
१०
सौंदर्यरस
 

हा तर वाङ्मयाचा हेतू आहे. तेव्हा त्यातील प्रत्येक अवयव हा अवयवीशी संबद्ध असला पाहिजे. उपरे, उपटसुंभ असे काही त्यात असता कामा नये. त्याने हानी होते. संबद्ध रचना म्हणजेच वाङ्मय होय.

 येथपर्यंत विचार केला तो चित्र, शिल्प, नृत्य, संगीत, साहित्य या मानवनिर्मित सौंदर्याचा. त्याच्याचबरोबर निसर्गसौंदर्याचा विचार करणे अवश्य आहे. निसर्गात फुले, इंद्रधनुष्य, तारका, समुद्रातील शिंपले, फुलपाखराचे पंख इत्यादी अनेकविध सुंदर वस्तू आपण पाहतो. त्यांना आपण कलाकृती म्हणत नाही. आणि मानवनिर्मित सौंदर्य व निसर्गनिर्मित सौंदर्य यांतील भेद दाखविण्याच्या दृष्टीने ते योग्य आहे. पण मूलतः या द्विविध सौंदर्यात फरक आहे असे वाटत नाही. फूल, इंद्रधनुष्य, नक्षत्रे, फुलपाखरे या सर्व रचनाच आहेत. त्यांचे सौंदर्य उचित सन्निवेशामुळेच निर्माण झाले आहे. व त्यामुळे मनात जी भावना निर्माण होते ती सुसंगती, सुरेखा, सुबंध पाहून जागृत होणाऱ्या भावनेहून निराळी नाही. या कलेचा कर्ता निसर्ग किंवा परमेश्वर हा आहे, असे फार तर म्हणावे, पण ते मानवकृत कलेपासून तिचा भेद दर्शवण्यापुरतेच होय. त्या दोन कलांच्या सौंदर्याच्या मूलतत्त्वात काही भेद आहे, म्हणून नव्हे. माझ्या मते ज्या उद्देशाने हे विवेचन चालले आहे, त्याच्या दृष्टीने चित्र, शिल्प, संगीत, नृत्य, नाट्य यांच्या सौंदर्यात आणि फूल, इंद्रधनुष्य, नक्षत्रे यांच्या सौंदर्यात भेद नाही. दोन्ही प्रकारचे सौंदर्य रचनासौष्ठवातूनच निर्माण होते. वरील वस्तूंच्या सौंदर्यापेक्षा निसर्गात आणखी एक प्रकारचे सौंदर्य आहे. समुद्र, गहन अरण्ये, नदी, निर्झर, प्रपात, विशाल वृक्ष, निळे आकाश, उंच पर्वत यात अनुपम सौंदर्य आहे, हे खरे आहे. आणि हे रचनाजन्य सौंदर्य आहे असे म्हणता येणार नाही. काही अंशी यात रचना आहे. पण या वस्तू पाहून जी भावना निर्माण होते ती उदात्तता, भक्ती, विस्मय यांसारखी आहे. म्हणून तिचा विचार आपल्या कक्षेत येत नाही. एरवी राहिलेले सर्व निसर्गसौंदर्य हे रचनाजन्य असल्यामुळे सौंदर्यरस- विचारात तेही अभिप्रेत आहे असे समजावे.

 संबद्ध रचना, उचित सन्निवेश, सुश्लिष्ट संधिबंध यांच्याबद्दलची आवड, नवनिर्मितीची उत्कट इच्छा ही मानवजातीच्या सहजप्रवृत्तींपैकी एक प्रवृत्ती