पान:सौंदर्यरस.pdf/१४

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
सौंदर्यरस
 

 रचना म्हटली की तिचा कर्ता आणि त्याच्या मनातील हेतू हे आलेच. लोकांच्या मनात हे इतके निश्चित उसले आहे की, परमेश्वराचे अस्तित्व सिद्ध करण्यासाठी, या जगाला रचना आहे हा मुद्दा निर्णायक म्हणून पुढे मांडला जातो, आणि मानवाचे कल्याण, मानवाची उन्नती हा परमेश्वराच्या मनातील हेतू म्हणून सांगितला जातो. पुष्कळ वेळा रोगांच्या साथी, अवर्षण, दुष्काळ, भूकंप, महापूर, ज्वालामुखीचा स्फोट यांनी भयंकर प्राणहानी झाली की जगाला रचना नाही, त्याला कोणी कर्ता नाही, व त्याच्या मनात काही हेतूही नाही, असे आक्षेप घेतले जातात. कारण त्या हेतूशी हे सर्व विसंगत आहे असे दिसत असते. अशा वेळी संत, तत्त्ववेत्ते निरनिराळी स्पष्टीकरणे देऊन त्या विसंगतीचा परिहार करीत असतात. 'फुटे तरुवर उष्णकाळ मासी, बाळा दुग्धा केली सवेची उत्पत्ती'- हा तसाच एक प्रयत्न आहे. तात्पर्य हे की, मनुष्याला विसंगती अत्यंत अप्रिय आहे. सुसंगती हा त्याच्या जीवनाचा दिलासा आहे आधार आहे. ते त्याचे परम श्रेय आहे. त्यावर आघात झाला की तो अस्वस्थ होतो. सर्व हरवले असे त्याला वाटते.

 प्रत्येक कलाकार आपल्या कलाकृतीच्या द्वारे आपली अनुभूती प्रकट करीत असतो. साहित्यात या अनुभूतीचे माहात्म्य फारच आहे. पण नुसती अनुभूती असे न म्हणता, 'सार्थ साभिप्राय अनुभूती' अशी शब्दयोजना करावी, असे ॲबरकोंबी या साहित्यशास्त्रज्ञाचे सांगणे आहे. सार्थ अनुभूती आविष्कृत करील ते साहित्य, असे तो म्हणतो. येथे सार्थ म्हणजे काय ? एखादी घटना सार्थ केव्हा ठरते ? ती घटना, ती वस्तू भोवतालच्या इतर वस्तूंशी कोणत्या धाग्यांनी निगडित आहे व अखेर तिचा जीवनाशी संबंध काय आहे हे दाखविले की घटना, वस्तू व तिची अनुभूती सार्थ होते. ॲबरकोंबी म्हणतो की, माणसाचा स्वभावच असा आहे की, ज्या अनुभूतीत वस्तू वा घटना विस्कळित आहेत, तुटक्या आहेत, परस्परबद्ध नाहीत, तिचा त्याला तिटकारा आहे ज्या साहित्यकृतीत घटना अलग अलग घडताना दिसतात, एकीचा दुसरीशी मेळ जीत नसतो ती त्याला आवडत नाही. ज्या अनुभूतीत तर्कहीन बेबंद असे काही घडत नाही, प्रत्येक घटना, प्रसंग, व्यक्ती, तिचे उद्गार हे इतर सर्व घटनावस्तूंशी सुसंगत असतात, सुसंवादी असतात तिलाच सार्थ अनुभूती म्हणावे. संसारातील घटनांची संगती लावणे