पान:सौंदर्यरस.pdf/१४७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१४२
सौंदर्यरस
 

आपल्या नाटकांतून असे भाष्य केले आहे. शॉ, गाल्सवर्दी तेच करतात. अष्टन सिंक्लेअर यासाठीच प्रसिद्ध आहे. त्याची आपण स्तुतिस्तोत्रे गातो ! मग ?
 सायंकेविग्ज या पोलिश कादंबरीकाराची 'को व्हॅडिम' ही कादंबरी पहा. रोमन साम्राज्याचा अधःपात व ख्रिस्तीधर्माचा उदय हा तिचा विषय आहे. व्हिनिशियस व लिजिया यांच्या प्रेमाच्या कथेच्या माध्यमातून त्याने त्याला मूर्त रूप दिले आहे. आणि तसे करताना त्याने त्या काळची प्रत्येक संस्था- धर्म, गुलामगिरी, राजसत्ता, विवाह, प्रेम, लष्कर- न्याहाळून पाहून तिच्यावर भाष्य केले आहे. या संस्था किडल्यावाचून एवढे मोठे रोमन साम्राज्य किडणे व कोसळणे शक्य नाही, हे त्याला निश्चित माहीत आहे आणि हे सर्व भाष्य त्याने साहित्यगुणांच्या आश्रयाने केले आहे. तो प्रसंग घडवितो, त्यातून वाद घडवितो, ख्रिश्चनांचे, स्त्रियांचे, पुरुषांचे, मालकांचे, गुलामांचे अंतरंग तपासतो आणि पदोपदी त्यावरून सुचलेल्या विचारांना; तत्त्वांना मूर्त रूप देतो यामुळे ती ऐतिहासिक कादंबरी अक्षर झाली आहे, विदग्ध झाली आहे, अभिजात झाली आहे.
 समोरच्या शत्रूच्या युद्धशास्त्राचा अभ्यास मराठ्यांनी कधी केला नाही. इंग्रजांचे कवायती कंपू त्यांनी पाहिले व तोफा पाहिल्या आणि तेवढे उचलले. पण यांच्या मागे जी भौतिक विद्या आहे, इतिहास आहे, भूगोल आहे, नकाशा आहे, रसायन-पदार्थविज्ञान आहे, त्याचा त्यांना वाससुद्धा कधी आला नाही ! कारण भौतिक विद्यांची त्यांनी शेकडो वर्षे उपेक्षाच केली होती. त्यामुळे त्यांना भौतिक दृष्टी नव्हती. कार्यकारण कळत नव्हते. त्यांच्या मनात परलोक नेहमी असे. निवृत्ती असे. 'दिसे क्षणिक हे भरंवसा घडीचा नसे' याच तत्त्वज्ञानाचा पगडा त्यांच्या मनावर होता. यामुळे पाश्चात्य संस्कृतीशी झालेल्या संग्रामात त्यांना विजय मिळविणे शक्यच नव्हते. ही मीमांसा राजवाडे, खरे, सरदेसाई, केळकर, शेजवलकर यांनी केलेली आहे. तिला ललित रूप देणे एवढेच नव्या कादंबरीकारांचे काम होते. पण ऐतिहासिक कादंबरी लिहिताना, अधःपाताची, उत्कर्षाची मीमांसा करताना आपल्या सामाजिक, धार्मिक, राजकीय, आर्थिक संस्थांचे