पान:सौंदर्यरस.pdf/१४६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
ही नवनिर्मिती नव्हे !
१४१
 

याचा तलास घेण्याचा, त्या वेळच्या मानवाच्या मनाच्या घडणीचा, संस्कारांचा अंतरंगाचा ठाव घेण्याचा विसाव्या शतकाच्या उत्तरार्धातील कादंबरीकारांनी प्रयत्नही करू नये !
 मराठ्यांकडचे बव्हंशी सर्व सरदार, सेनापती हिंदू होते, मराठे होते. पण फूट, दुही त्यांच्या पाचवीला पुजली होती. धर्मनिष्ठा त्यांना एकत्र बांधू शकत नव्हती. परधर्मीय मुस्लिम, ख्रिश्चन यांच्या विरुद्धही हिंदुधर्मी एक होत नव्हते. उलट पुष्कळ वेळा मुस्लिम तसे होत असत. तेव्हा हा काय धर्म आहे, याला सामाजिक जीवन सांधण्याचे सामर्थ्य का नाही, असा प्रश्न मराठ्यांचा व भारताचा इतिहास पहाताना या आधुनिक इतिहासाभ्यासकांच्या चित्तात उद्भवलासुद्धा नाही. कादंबरीत या आपल्या समाजाच्या प्रधान संस्थेच्या- धर्माच्या- मुळांचा काही विचार प्रसंगांतून, घटनांतून, संवादातून किंवा स्वतःच्या निवेदनातून मांडावा, असे त्यांच्या मनातही आले नाही.
 पेशवे कायमचे कर्जबाजारी असत. पैसा मिळवावयाचा म्हणजे परप्रांतात जाऊन लूट करावयाची, आणि भागले नाही तर शेवटी स्वतःच्याच प्रजेला लुटावयाचे, असा मराठ्यांचा उत्तरकाळात खाक्या. शेती, व्यापार असे काही निराळे मार्ग असतात. त्यांची जोपासना करावी, असे मराठ्यांना वाटलेच नाही. त्या धामधूमीत ते मंदिर बांधीत, घाट बांधीत शंभर-दोनशे धरणे सहज होतील इतके घाट पेशव्यांनी वा त्यांच्या सरदारांनी बांधलेले आहेत. पण धरणे बांधावी, बंधारे बांधावे, पाठ खोदावे, ही दृष्टी त्यांना का आली नाही ? इंग्रजांना पैसा कमी पडत नाही, व्यापारात तो ते मिळवितात, हे त्यांना दिसत होते. पण लूट हा त्यांचा एकच मार्ग. त्यामुळे रजपूत, बंगाली, कन्नड- सर्व लोक त्यांना दरोडेखोर, लुटारू समजत. उलट मोगल त्यांना बरे वाटत. इंग्रजांचा आधार वाटे. हे पाहून या समाजाच्या अर्थसंस्थांचा काही मागोवा आपण घ्यावा, तत्कालीन आर्थिक जीवनाच्या तळाशी जाऊन जरा न्याहाळून पहावे व ती सार्थ अनुभूती वाचकांना सांगावी, असे नव्या लेखकांना कधी का सुचत नाही ? हे जीवनभाष्य करणे हे आपले काम आहे असे त्यांना वाटतच नाही काय ? इब्सेनने