पान:सौंदर्यरस.pdf/१४८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
ही नवनिर्मिती नव्हे !
१४३
 

अंतरंग ढवळावे लागते, सर्व जीवनाची चिकित्सा करावी लागते, याची जाणीवच नव्या कादंबरीकारांना नाही. कंपू-तोफांच्या मागच्या विज्ञानाचा मराठ्यांना जसा वास आला नाही तसा यांनाही आला नाही ! त्यामुळे त्यांनी आपल्या जीवनाची मुळेसुद्धा पाहिली नाहीत. मग साहेबांच्या जीवनाची ते कोठून पहाणार ? वास्तविक तीही मुळे पाहून सायंकेविग्ज याने दोन संस्कृतींचा संघर्ष कसा झाला ते दाखविले आहे, तसा मराठी कादंबरीकारांनी दाखवावयास हवा होता.
 प्रत्येक लेखकाला स्वतंत्र दृष्टिकोन असतो, असावा. जीवनाविषयीचे काही त्यांचे तत्वज्ञान असते, असावे. त्यातून व्यक्तिनिष्ठ दृष्टीने तो संसार पहातो. आणि त्याला दिसलेले ते त्याचे रूप तो ललितरम्य करून मांडतो. साहित्यात मोल आहे ते या जीवनसृष्टीला आहे. या आत्माविष्काराला आहे. पण अशा समृद्ध दृष्टीने मराठ्यांच्या इतिहासाकडे कोणी पाहिलेच नाही. त्यामुळे कोणाला आमच्या अधःपाताला फक्त दुसऱ्या बाजीरावाचे दुर्देव कारण आहे असे वाटते. कोणाला इंग्रजांची कपटकारस्थाने, त्यांची हीन नीती, हे कारण वाटते. मागले पोवाडेवाले शाहीर यांना असेच वाटत असे. त्यात भरीला ते कलियुगामुळे झाले, आपण पापे करतो म्हणून झाले त्यामुळे इंग्रज या मुंगीने बाजीराव हा मेरू गिळिला, असे ते म्हणत.
 आधुनिक ऐतिहासिक कादंबरीकार या पुराणकथातून बाहेर पडले, आहेत असे दिसत नाही. मातीचा घट होतो तो कुंभकाराच्या संकल्पातून होतो. मूळ मातीला आकार नसतो. सोन्याचा अलंकार असाच सोनाराच्या संकल्पातून होतो, तो मुळात नसतो, असे ज्ञानेश्वर म्हणतात. तसेच जीवनाचे आहे. त्याला मुळात आकार नाही. तो कवीच्या संकल्पातून निर्माण करावा लागतो. त्यामुळेच ती नवनिर्मिती होते. पण संबंध जीवन जाणण्याइतकी प्रतिभा असेल तरच कवीचा संकल्प विशाल होईल. आणि मग त्यातून नवी सृष्टी निर्माण होईल. ती प्रतिभा आधुनिक ऐतिहासिक मराठी कादंबरीकारांजवळ नाही. त्यामुळे त्यांची निर्मिती नवनिर्मिती होत नाही. ती अपूर्ववस्तू ठरत नाही.