पान:सौंदर्यरस.pdf/१४५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१४०
सौंदर्यरस
 

 लेखकाला, कवीला काही अनुभूती येते, ती अनुभूती तो वाचकांना घडवितो. यालाच साहित्य म्हणतात, पण नुसती अनुभूती म्हणजे साहित्य नव्हे, असे ॲबरकोंबी, विंचेस्टरसारखे साहित्य-शास्त्रज्ञ म्हणतात. ती अनुभूती सार्थं असली पाहिजे.'मी सूर्य पाहिला' हे साहित्य नाही. सूर्य पाहून मला काय वाटले ते सांगणे हे साहित्य. शुक्राची चांदणी तांबे पाहातात आणि खिन्न मनाला सांगतात की, निराश होऊ नको. आणि मग सर्व चराचर सृष्टी हेच सांगत आहे असे दाखवून देतात. शुक्राबद्दल व चराचरसृष्टीबद्दल तांबे यांनी स्वतःच्या दृष्टिकोनातून जो अर्थ सांगितला त्यासह येणारी जी अनुभूती, ती सार्थ अनुभूती होय. तेच जीवनभाध्य, व तोच आत्माविष्कार. जागतिक घडामोडी पाहून, संसारातील घटना पाहून त्यांचा काही अर्थ लेखकाच्या मनात येतो व मग त्या सूत्रात सांसारिक घटना किंवा सृष्टिघटना बसवून तो काव्य, नाटक, कादंबरी लिहितो. नव्या ऐतिहासिक कादंबरीकारांकडून आमच्या या अपेक्षा होत्या.
 शिवकालापासून दुसऱ्या बाजीरावापर्यंत सर्व मराठशाहीचा इतिहास या कादंबरीकारांनी आपल्या कादंबऱ्यांत आणला आहे हे विसाव्या शतकांतले कादंबरीकार आहेत. पाश्चात्य विद्याविभूषित आहेत. त्यांनी इतिहासातून लाभलेल्या दृष्टीने या मागल्या इतिहासावर काही भाष्य केले आहे काय ? या लेखकांपैकी अनेकांनी संदर्भग्रंथांच्या याद्याच्या याद्या दिल्या आहेत. कित्येकांनी प्रस्तावनेत आपण कसा कसा इतिहासाभ्यास केला, ते वर्णन सांगितले आहे. पण या अभ्यासातून, त्या काळच्या एकंदर मानवी जीवनाच्या संदर्भात, मराठ्यांच्या कर्तृत्वाचा हा अर्थ मला प्रतीत झाला, असे त्यांनी काही सांगितले आहे काय ?
 श्रीशिवछत्रपतींपासून दुसऱ्या बाजीरावांपर्यंत मराठ्यांच्या कपाळची फितुरी कधी चुकली नाही. सरदार फितूर, किल्लेदार फितूर, सेनापती फितूर, ब्राह्मण फितूर, मराठे फितूर लहान मोठे सर्व फितूर. पुढे पेशवे राघोबा, बाजीराव हे फितूर, आणि शेवटी छत्रपती फितूर ! उलट साहेबाकडे असे कोणी नाही. मराठ्यांनी पदरी ठेवलेले इंग्रज सरदारही मनातून इंग्रजांकडे असत. 'त्यांशी आम्ही लढणार नाही' असा करार बांधून घेत. हे असे का घडावे, सामाजिक, राष्ट्रीय दृष्टी येथे का निर्माण झाली नाही,