पान:सौंदर्यरस.pdf/१४३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१३८
सौंदर्यरस
 

घडली असती. पण त्याआधी रणांगणात मरून जाऊ अशी त्यांची भाषा होती, तिचे काय झाले ? आणि लढाई न करता निसटून जाऊन पुन्हा तयारी करायला काय हरकत होती ? पण श्रीमंतांनी विवेक केला, आणि ते शत्रूच्या स्वाधीन झाले ! श्रीमंत दर वेळी युद्धाचा पोशाख करीत हे मात्र खरे आहे. ते त्यांना उत्तम जमत असे. पण नंतर वेळ आली की ते विवेक करीत. उगीच हत्या होऊ देण्यात अर्थ नाही असे त्यांना वाटे. त्रिंबकजी डेंगळे असाच ऐन वेळी विवेक करीत असे. तो इंग्रजांच्या का स्वाधीन झाला ? 'या वेळी लढाईची तयारी नाही. उगाच संहार होईल. ते योग्य नाही. तेव्हा मराठशाहीसाठी मी आत्मबलिदान करतो !'
 केवढी उदात्त भूमिका ही! गणपतराव पानसे त्या वेळी म्हणत होते की, 'आताच सोक्षमोक्ष होऊ द्या ! दसरा झाल्यावर आमच्या फौजा इंग्रजांना घेरणारच होत्या. त्याऐवजी आताच युद्धाला तोंड लागेल.' पण त्रिंबकजीला यशाची थोडीसुद्धा आशा वाटत नव्हती. म्हणून त्याने विवेक केला.
 वास्तविक त्रिंबकजीच्या कर्तृत्वाचे वर्णन करताना इनामदारांनीच सांगितले आहे की, पेंढाऱ्यांशी त्याने संधान बांधले होते. त्यांचा सरदार रामदीन त्रिंबकजीला भेटला होता. त्याने आश्वासन दिले होते की, आमची सव्वा लाख फौज श्रीमंतांचा इशारा येताच इंग्रजावर तुटून पडेल ! शिवाय पाच सहा हजार भिल्ल होते. तरी त्रिंबकजीला यशाची आशा वाटत नव्हती. त्याला तरीही या वेळी रक्तपात टाळावा असेच वाटले. त्याची सर्वकष मुत्सद्देगिरी ती हीच ! इंग्रजांच्या तुरुंगातून निसटल्यावरही तो पेंढाऱ्यांकडे किंवा रणजितसिंगाकडे गेला नाही. आसपास छापे घालीत राहून, जे संकट टाळण्यासाठी त्याने आत्मबलिदान केले ते पुन्हा तयारी नसताना ओढवून घेतले. हीही मुत्सद्देगिरीच ! वास्तविक तसेच त्याने उत्तरेत जाऊन पेंढाऱ्यांची सव्वा लाख फौज घेऊन यावयाचे. सर्व हिंदुस्थानात त्याच्यापुढे कोणी उभा राहू शकला नसता. असे असूनही त्याने विवेक केला, लढाईचा पोशाख केला व आत्मबलिदान केले.