पान:सौंदर्यरस.pdf/१४१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१३६
सौंदर्यरस
 

दिले आहे. ही कोकणाची कथा आहे. पण हे सांगावे लागत नाही. 'अवो ती तांब्याची पाटी'... 'पला पला !'...' मिनी आइकलां'... .'मी पघतांव्'... 'रे भटा ! गो आबई'... 'तुम्ही हांव् कुटं'... 'अगे आक्रंदायास काय झालें ?'... 'मेल्या, तूंस झालें तरी काय'... या वाक्यांवरून ते सहज ध्यानात येते.
 कोकणात धनगर आहेत, भंडारी आहेत, मराठे माहेत, ब्राह्मण आहेत, लमाण आहेत, काळे सिद्दी आहेत. वर घाटी येताना शिवथर घळीत या लोकांना समर्थ रामदासस्वामी भेटतात. त्यांचे कल्याण, उद्धव हे शिष्य तेथे आहेत. आणि वर स्वतः शिवाजीराजे, अनाजी दत्तो भेटतात. यांचे संवाद रचताना काळभेद, प्रांतभेद, धर्मभेद, वर्गभेद, जातिभेद, या सगळ्यांकडे लक्ष ठेवून दांडेकरांनी तशी तशी अनुरूप भाषा त्याच्या त्याच्या मुखी घातलेली आहे. त्यामुळे प्रत्येक व्यक्ती निराळी दिसते. तिच्या मुलखाचा बोध होतो, व तिची मनोवृत्तीही स्पष्ट होते.
 दांडेकरांनी स्वतः निवेदन करतानाही त्यांच्या मराठीला सतराव्या शतकातल्या कोकणी, घाटी मराठीची डूब देण्याचा प्रयत्न केला आहे. भाषाशैली ती हीच. तिच्यामुळे निवेदनाला सौंदर्य येते. हे सौंदर्य म्हणजे साहित्याचा महत्त्वाचा शृंगार होय. पण नवी ऐतिहासिक कादंबरी या शृंगाराची बूज राखीत नाही. गो. नी. दांडेकर हे अपवाद वाटतात. तसे दांडेकर बऱ्याच बाबतीत अपवाद आहेत. कोकण हा लहान परिसर त्यांनी निवडला आहे, आणि कथा आहे ती दोन वर्षातलीच आहे. त्यामुळे कोकणचे वातावरण निर्माण करण्यात त्यांना यश आले आहे आणि मुख्य म्हणजे, व्यक्तिजीवनातील रस आळविणे व समर फुलविणे याला त्यांना अवसर मिळाला आहे. रोहिडेश्वरापासून राज्याभिषेकापर्यंत सर्व घटना एका पोत्यात भरण्याचा अट्टाहास त्यांनी केलेला नाही. याच्या जोडीला बाबलभट किंवा मायनाक भंडारी यांच्या जीवनात 'उषःकाला'तील नानासाहेब किंवा सूर्याजी यांच्यासारखी उंची निर्मिली असती, तर कादंबरी उंच, थोर झाली असती. आहे या स्थितीत तिचा जीव लहानच राहिला आहे.